सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. ०८ : करोनाच्या स्थिती लॉकडाऊन काळात 24 तास जनतेच्या संरक्षणासाठी राबणारे पोलीस जनतेसाठी हिरो ठरले. मात्र आता लॉकडाऊन संपल्यानंतर पोलीस खात्यातील अधिकारी कामाला लागले असून तब्बल 25 लाख रुपयांची लाच मागितल्याचे पुरावे समोर आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने  सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर यांना अटक केली होती. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

करोना आला आणि माणुसकी जागली. आता समाजातील क्राईम कमी होणार असे काहीसे वातावरण निर्माण झाले होते. लॉकडाऊनमुळे माणसांना कुटुंबे कळाली आणि कुटुंब व्यवस्था सुरळीत झाल्याचाही भास झाला. मात्र लॉकडाऊन संपल्यानंतर एकीकडे कोरोनाचा कहर सुरु असताना जगरहाटीही सुरु झाली आहे. यामध्ये क्राईम रेटही वाढू लागला असून माणसे पुन्हा माणसे झाल्याचा प्रत्यय माणसेच घेवू लागली आहेत.

सातारा शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर हे माहुली दूरक्षेत्राचा कारभार सांभाळत आहेत. त्यांनी एका तक्रारदाराकडून त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्हय़ात मदत करण्यासाठी तब्बल 25 लाखाची लाच मागितली होती. याबाबत त्यांचे तक्रारदाराशी बोलणे होते. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार केल्यानंतर मग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खात्री केली असता हा प्रकार सुरु असल्याचे समोर आले.

पोलीस दलात उडाली खळबळ..त्यानंतर दि. 6 रोजी सायंकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक वाळवेकर जरी प्रत्यक्ष लाच घेताना रंगेहाथ सापडले नाहीत तरी त्यांनी लाच मागितली होती म्हणून मग त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकारामुळे पोलीस दलासह साताऱयात देखील खळबळ उडाली आहे. लाचेची रक्कम ऐकून अनेकांच्या काळजात धस्स झाले तर पोलीस दलातील वरिष्ठ देखील या प्रकारामुळे स्तंभित झाले असून ही एक दुर्दैवी घटना म्हणून त्याकडे पहात आहेत.दरम्यान, धोंडीराम वाळवेकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक सातारा विभागाचे उपअधिक्षक अशोक शिर्के यांनी दिली. वाळवेकर यांच्या भोगाव, ता. पन्हाळा गावी तसेच ते तामजाईनगरमध्ये रहात असलेल्या ठिकाणी छापे टाकण्यात आले मात्र फारसे काही हाती लागले नाही, अशी माहिती देण्यात आली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!