फलटण, दि.२: श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योगाच्या माध्यमातून सन २०२०-२०२१ च्या गळीत हंगामासाठी संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून यावर्षीच्या हंगामात ५ लाख मे.टन उसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. श्रीराम कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादकांनी आपला संपूर्ण ऊस गाळपासाठी श्रीरामकडे पाठवून गळीताचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन श्रीराम’चे चेअरमन मा.डॉ.बाळासाहेब शेंडे यांनी केले आहे.
ज्येष्ठ संचालक व ज्येष्ठ ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांच्या हस्ते बॉयलर प्रदीपन
गळीत हंगामातील बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभ आज शुक्रवार दि.२ रोजी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक मा.श्री.यशवंतराव सुर्यवंशी व त्यांच्या सुविद्य पत्नी मा.सौ.प्रभावती सुर्यवंशी आणि कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ७ गटातून प्रत्येकी एक ज्येष्ठ ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांच्या शुभहस्ते करण्यात आला. त्यावेळी मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), कारखान्याचे चेअरमन मा.डॉ.बाळासाहेब शेंडे, व्हाईस चेअरमन मा.श्री.नितीन भोसले व सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे कार्यकारी संचालक मा.श्री.सी.डी.तळेकर, श्रीराम जवाहरचे प्रोजेक्ट मॅनेजर मा.श्री.मानसिंग पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, कामगार आणि ऊस उत्पादक शेतकरी सभासद उपस्थित होते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते मशिनरी व बॉयलर पूजन तसेच होम हवन केल्यानंतर बॉयलर अग्नी प्रदिपन करण्यात आले.
पूर्ण क्षमतेने हंगाम पूर्ण करण्याची तयारी
यावर्षीच्या हंगामासाठी कारखान्याची मशिनरी दुरुस्ती, देखभाल, परिसर स्वच्छता या कामांसह तोडणी वाहतूक यंत्रणेचे सक्षमीकरण करण्यात आले असून पूर्ण क्षमतेने गळीत हंगाम पार पाडण्याच्या दृष्टीने संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असल्याचे नमूद करीत यावर्षीच्या हंगामासाठी ८ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावरील ऊसाची नोंदणी कारखान्याकडे झाली असून या संपूर्ण उसाचे गाळप करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे श्रीराम’चे चेअरमन मा.डॉ.बाळासाहेब शेंडे यांनी स्पष्ट केले.
गतवर्षीच्या हंगामातील ऊसासह संपूर्ण पेमेंट केले
गतवर्षीच्या हंगामात ३ लाख ४० हजार मे.टन उसाचे गाळप करण्यात आले असून प्रति टन २५६३ रुपये एफआरपी प्रमाणे या संपूर्ण उसाचे पेमेंट ऊस उत्पादक शेतकर्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे गतवर्षीच्या हंगामातील तोडणी वाहतूक ठेकेदार, कामगार तसेच कारखान्यातील कामगार व व्यापारी देणी पूर्णत: अदा करण्यात आली असल्याचे निदर्शनास आणून देत यावर्षीच्या हंगामासाठी तोडणी वाहतूक ठेकेदार, ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडी वगैरे वाहतूकदारांना आगाऊ पेमेंट अदा करण्यात आलेअसून यावर्षीच्या हंगामात कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून उद्दीष्टाप्रमाणे ५ लाख मे.टन गाळपासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याचे श्रीराम’चे मा.डॉ.बाळासाहेब शेंडे यांनी सांगितले.