सभागृहाला साजेसे असेच कामकाज करणार : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०४ जुलै २०२२ । मुंबई । कुलाबा विधानसभा मतदारसंघाचे तरुण तडफदार आमदार राहुल नार्वेकर यांची विधानसभेचे अध्यक्षपदी बहुमताने निवड झाली. त्यांनतर सभागृहामध्ये अभिनंदन प्रस्तावानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यावेळी भारतातील संसदीय लोकशाहीच्या वाटचालीत वैशिष्टयपूर्ण स्थान असलेल्या “महाराष्ट्र विधानसभा” या राज्यातील सर्वोच्च सभागृहाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आभार व्यक्त केले. विधानसभेच्या सभागृहाला साजेसे असेच आपण कामकाज करणार असल्याचे मत सुद्धा यावेळी ना. राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी ना. राहुल नार्वेकर; अभिनंदन प्रस्तावानंतर सभागृहात व्यक्त केलेल्या भावना जश्या आहेत तश्या –

१. विधेयके चर्चेविना संमत होणे अयोग्य
२. परिणामकारक वैधानिक कार्यासाठी तत्पर राहू
३. सभागृहात दर्जेदार चर्चा व्हावी
४. कुलाबा मतदारसंघाचा मी आमदार आणि विधान भवनाची वास्तू कुलाबा मतदारसंघात हा दुर्लभ योग
५. अध्यक्षपद न्यायबुध्दीने सांभाळीन
६. सभागृह कामकाजाचा क्षण आणि क्षण शोषित, वंचितांच्या कल्याणासाठी खर्च करू

भारतातील संसदीय लोकशाहीच्या वाटचालीत वैशिष्टयपूर्ण स्थान असलेल्या “महाराष्ट्र विधानसभा” या राज्यातील सर्वोच्च सभागृहाच्या अध्यक्षपदी आपण माझी निवड केली त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानण्यासाठी उभा आहे. देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजी, कणखर गृहमंत्री माननीय श्री.अमितभाई शहा आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री.जे.पी.नड्डाजी यांच्या शुभेच्छा आणि आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे आणि माननीय उप मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांचे मार्गदर्शन प्राप्त करीत, तसेच आपणा सर्वांच्या सदिच्छांसह मी विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यभार नम्रपणे स्वीकारीत आहे.

भारतीय स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सवी वर्षात टिळक-गोखले-आंबेडकर-नाना पाटील-सावरकर यासारख्या महान देशभक्तांची भूमी असलेल्या महाराष्ट्राच्या या सर्वोच्च सभागृहाच्या अध्यक्षपदी आपण माझी निवड केली हा मी माझ्या आजपर्यंतच्या सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीतील सर्वोच्च बहुमान समजतो.

भारतीय स्वातंत्र्यलढयासाठी त्याग आणि बलिदान दिलेल्या सर्व आदरणीय नेत्यांना आणि शूरवीरांना तसेच छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतीबा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, या सभागृहाचे आणि लोकसभेचे पहिले अध्यक्ष दादासाहेब मावळणकर अशा सर्व महात्म्यांना मी या आसनावरुन नतमस्तक होत वंदन करतो. लोकशाहीतील हे महत्वाचे पद मी गांभीर्याने आणि न्यायबुध्दीने सांभाळीन अशी ग्वाही मी आपणाला देतो.

माझी या पदावर निवड झाल्यानंतर ज्या सन्माननीय सदस्यांनी आपल्या अभिनंदनपर भावना व्यक्त केल्या ते सर्वश्री माननीय मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे, माननीय उप मुख्यमंत्री श्री.देवेन्द्र फडणवीस, माननीय श्री.अजितदादा पवार, माननीय श्री.बाळासाहेब थोरात, माननीय श्री.सुनील प्रभू, माननीय श्री.अबू आझमी, माननीय श्री.बच्चू कडू, माननीय श्री.सुधीर मुनगंटीवार, माननीय श्री.जयंत पाटील, माननीय श्री.नाना पटोले, माननीय श्री.आदित्य ठाकरे, माननीय श्री.दीपक केसरकर, माननीय श्री.हरीभाऊ बागडे, माननीय श्री.किशोर जोरगेवार, माननीय श्री.धनंजय मुंडे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष तथा माननीय कार्यकारी अध्यक्ष श्री.नरहरी झिरवाळजी या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो.

आपली संसदीय लोकशाही सर्व प्रकारच्या राजकीय विचारछटांना स्थान देते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. जनताजनार्दन हा आपल्या मताधिकाराद्वारे सरकार निवडून आणतो किंवा आधी निवडलेले सरकार पुढल्यावेळी पराभूत देखील करतो. जनादेशाचा आदर राखणे आणि संसदीय सभ्याचार जपला जाणे आवश्यक आहे.
ब्रिटनला संसदीय कार्यप्रणालीची जननी म्हणून ओळखले जाते. राजाचे अधिकार आणि हस्तक्षेप मर्यादित होत होत तेथील लोकशाही गेल्या ८०० वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर विकसित होत गेली. प्रगल्भ आणि परिपक्व होत गेली. मात्र तरिही विन्स्टन चर्चिल यांच्यासारख्या तेथील पंतप्रधान आणि मुत्सद्याला –
“The best argument against democracy is a five-minute conversation with the average voter !” असे का बरे म्हणावे लागले असेल…? चर्चिल साहेबांच्या या मार्मिक अवतरणामध्ये खूप काही दडले आहे.

“Speaker has less to speak” याची मला जाणीव आहे, कारण यापुढील काही काळ मला “more to listen” ची भूमिका पार पाडायची आहे !

ज्या विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी आपण माझी निवड केली त्या विधानसभेची ही पवित्र वास्तू मला जनतेने निवडून दिलेल्या कुलाबा मतदारसंघातच येते. “विधानसभा अध्यक्ष” हे विधानसभा ज्या मतदारसंघात येते, त्याच मतदारसंघाचे आमदार हा एक दुर्लभ असा योग माझ्या बाबतीत आपणा सर्वांमुळे घडून आला आहे. अर्थात त्यामुळे सगळ्यांना सत्र काळात आणि नि:सत्रकाळातही २४ x ७ उपलब्ध असलेला विधानसभा अध्यक्ष आता लाभणार आहे. विरोधीपक्षातील आमचे सर्व मित्र त्याचे निश्चितच स्वागत करतील अशी मला आशा आहे…

महाराष्ट्र विधानमंडळ हे राज्यातील तेरा कोटी जनतेच्या इच्छा-आकांक्षांचे प्रतीक आहे. आपणा सारख्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत या इच्छा-आकांक्षा विविध संसदीय आयुधांच्या माध्यमातून सभागृहात मांडल्या जाणे आणि त्यानुसार निर्णयप्रक्रियेचे चक्र गतीमान राहणे आवश्यक आहे. जेव्हा सभागृहाचा वेळ गोंधळामुळे वाया जातो तेव्हा असे वर्तन म्हणजे एक प्रकारे जनताजनार्दनाच्या भावभावनांची आणि अपेक्षांची प्रतारणा आहे, हे लक्षात घेतले जावे. त्यादृष्टिने यापुढील काळात सभागृह कामकाजाचा क्षण आणि क्षण लोकहिताच्या कारणासाठी, निर्णयाभिमुख चर्चेसाठी, विकासाभिमुख नियोजनासाठी आणि समाजातील अंतिम घटकांच्या– शोषित वंचितांच्या उध्दारासाठी खर्ची पडेल अशी ग्वाही मी आजच्या निवडी प्रसंगी देतो. आपण सर्व सदस्य या उद्दिष्टांसाठी मला सहकार्य कराल अशी मला खात्री आहे.

कायदे करणे हे कायदेमंडळाचे महत्वाचे कार्य आहे. विधेयकांवर दोन्ही बाजूने सांगोपांग चर्चा होऊन येणारा नवीन कायदा अधिकाधिक परिपूर्ण असावा अशी अपेक्षा असते. दुर्दैवाने महत्वाची विधेयके सुध्दा चर्चेविना संमत होणे, सभागृहातील दोन्ही बाजूंसाठी आणि विशेषत: लोकहिताचे वैशिष्टयपूर्ण कायदे राज्याबरोबरच देशालाही देणाऱ्या आपल्या विधानमंडळासाठी, भूषणावह नाही. यासंदर्भात येत्या काळात परिस्थिती निश्चितच सुधारलेली असेल, त्यादृष्टीने काही व्यवस्था आपण तयार करु अशी मी आपणा सर्वांना खात्री देतो.

मी आणखी एका दृष्टीने भाग्यवान विधानसभा अध्यक्ष ठरणार आहे. त्याचे कारण याच सभागृहात चार माजी विधानसभा अध्यक्ष स्थानापन्न आहेत ! मागील विधानसभेचे अध्यक्ष (१) माननीय श्री.हरिभाऊजी (नाना) बागडे, त्याअगोदरच्या विधानसभेचे अध्यक्ष (२) माननीय श्री.दिलीप वळसे-पाटील, या विधानसभेचे पहिले अध्यक्ष (३) माननीय श्री.नाना पटोले – असे तीन माजी अध्यक्ष आणि याच विधानसभेचे कार्यकारी अध्यक्ष राहिलेले उपाध्यक्ष (४) माननीय श्री.नरहरी झिरवाळ हे कार्यकारी असल्यामुळे चौथे, असे चार माजी अनुभवी अध्यक्ष मला मार्गदर्शन करण्यासाठी याच सभागृहात तत्पर असणार आहेत…

आपल्या सभागृहाला दिग्गज अध्यक्षांची अतिशय तेजस्वी आणि प्रेरक परंपरा लाभली आहे. आदरणीय गणेश वासुदेव मावळणकर, कुंदनलाल फिरोदिया, दत्तात्रेय कुंटे, सयाजी सिलम, बाळासाहेब भारदे, शेषराव वानखेडे, बाळासाहेब देसाई, शिवराज पाटील अशी ही मोठी परंपरा आपल्या समोर आहे. या मान्यवरांनी आपल्या संसदीय लोकशाहीचा सन्मान उंचावला आहे.

सन १९६२ ते १९७२ अशी सलग दहा वर्षे ज्येष्ठ गांधीवादी नेते आणि वारकरी तत्वज्ञान, महाराष्ट्रातील कीर्तन परंपरा यांचे अध्वर्यू आदरणीय बाळासाहेब भारदे हे या विधानसभेचे अध्यक्ष होते. त्यांनी या विधानमंडळाला “लोकशाहीच्या मंदिराची” अतिशय समर्पक उपमा दिलेली आहे. सभागृहातील चर्चेचा स्तर दर्जेदार असायला हवा. दोन्ही बाजूंनी आपले घटनादत्त कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडावे असे आवाहन मी आपणांस करतो.

आपण सर्व सन्माननीय सदस्य अशाप्रकारे उत्तम आणि परिणामकारक वैधानिक कार्य करण्यासाठी तत्पर राहू, अशी सदिच्छा मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानून येथेच थांबतो.

जय हिंद ! जय महाराष्ट्र !


Back to top button
Don`t copy text!