दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत निवडणूक आयोगामार्फत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीपअंतर्गत मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्याच्या अनुषंगाने २५५ फलटण (अ.जा) विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान जनजागृतीसाठी दि. १७ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ९.०० वाजता तहसील कार्यालय फलटणपासून प्रभातफेरी काढण्यात आली.
ही प्रभातफेरी महात्मा फुले चौक, गजानन चौक, उमाजी नाईक चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसिंह नाना पाटील चौक, पुण्यश्लोक आहिल्यादेवी चौक, डीएड चौक, गिरवी नाका ते तहसील कार्यालय अशी काढण्यात आली होती. यावेळी मतदारराजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो, आपले मत आपले भविष्य ही घोषवाक्य देण्यात आली.
मतदार जनजागृती रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदारांनी सहभाग घेतला होता. यावेळी सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार फलटण डॉ. अभिजित जाधव यांनी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदान जनजागृती प्रभातफेरी आयोजन केल्याचे सांगून मतदारांनी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडण्याचे आवाहन केले.
मतदार मोठ्या संख्येने या प्रभातफेरीमध्ये सहभागी झाले होते. मतदान जनजागृती प्रभातफेरी व रॅलीचे नियोजन नोडल स्वीप अधिकारी सचिन जाधव यांच्यासह स्वीप टीममार्फत करण्यात आले होते. यावेळी फलटण तालुक्यातील प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक तसेच महाविद्यालय कॉलेजमधील विद्यार्थी उपस्थित होते.