केंव्हाही लागू शकते विधानसभा आचारसंहिता!; पहा जिल्हाधिकाऱ्यांनी काय दिले निर्देश…

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 25 सप्टेंबर 2024 | सातारा | विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे. एकमेकांशी समन्वय ठेवावा. निवडणूकीशी संबधीत कामकाजाबाबत अधिकारी , कर्मचारी यांना अनुषंगीक प्रशिक्षण द्यावे असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले.

कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने निवडणूक विषयक कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, ऊपजिल्हाधिकारी (निवडणूक) भगवान कांबळे, उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, विविध विभागाचे नोडल अधिकारी यांच्यासह सर्व प्रांताधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी म्हणाले, निवडणूक आचार संहिता घोषित झाल्यानंतर तिचे काटेकोरपणे पालन व्हावे. यासाठी सर्व सबंधित विभागांनी आपल्याकडील मनुष्यबळाला आवश्यक ते प्रशिक्षण आतापासुनच द्यावे. प्रत्येक विधानसभा मतदार संघात कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने कामकाज पाहणाऱ्या विभागांचा यामध्ये पोलिस, महसुल आरटीओ, उत्पादन शुल्क, जीएसटी यांसारख्या विभागाच्या अधिकाऱ्यांचा सामावेश असणारे एक पथक कार्यरत ठेवावे. निवडणुकीच्या काळात अवैध दारु , रोख रक्कम यांचा गैरवापर होणार नाही यासाठी काटेकोर दक्षता घ्यावी.लिकरचे उत्पादन ,पुरवठा विक्री याचा अहवाल १ ऑक्टोबर पासुनच जिल्हा व पोलिस प्रशासनाला द्यावा. एमआयडीसीमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी व त्याद्वारे मॉनिटरिंग करावे, औषध निर्मिती कंपन्यांच्या नियंत्रणासाठी अन्न व औषध विभागाने कर्मचारी नियुक्त करावे.त्याठिकाणी सीसी टिव्ही लावावेत व त्यांचा अहवाल द्यावा.

पोलिस अधिक्षक समीर शेख म्हणाले, संभाव्य निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अनुषंगाने आवश्यक प्रतिबंधात्मक कार्यवाहीची सुरवात करावी. सर्व प्रांत अधिकाऱ्यांनी सोनार संघटना, व्यापारी संघटना, ट्रॅव्हल संघटना, लिकर संघटना, आदी विविध सघंटनांची बैठक घ्यावी. त्यांना नियमांबाबत अवगत करावे. टोल – नाक्यावरुन ये – जा करणाऱ्या लक्झरींची काटेकोर तपासणी करावी. विनापरवाना लावलेले बॅनर, प्रचारासाठी विनापरवाना मॉडिफाय केली जाणारी वाहने यावर कारवाई करावी. एमआयडीसी मधील आजारी अथवा बंद उदयोग, गोडावून यांच्या ठिकाणी भेटी देवून नियमितपणे तपासणी करावी, आदींबाबत सविस्तर सुचना समीर शेख यांनी दिल्या.


Back to top button
Don`t copy text!