दैनिक स्थैर्य । दि. ०५ डिसेंबर २०२१ । सातारा । जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या झालेल्या निवडणुकीत सहकार पॅनेलने बाजी मारली असली तरीही सहकार पॅनेल हे भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचेच होते असे चित्र दिसत होते. विरोधात मात्र शिवसेना, काँग्रेसच्या उमेदवारांनी लढत दिली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या या बँकेच्या अध्यक्षपदासाठी सध्या चढाओढ सुरु आहे. निवडी दि. 6 रोजी होत असल्यातरी महाबळेश्वर तालुक्यातील राजेश राजपुरे यांच्यापासून पाटणचे सत्यजितसिंह पाटणकर यांनी सुद्धा अध्यक्षपदासाठी मागणी केली आहे. सध्या दोनच नावांची चर्चा जोरदारपणे सुरु आहे ती म्हणजे भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे आणि नितीन पाटील यांची. त्यामध्ये शिवेंद्रराजे यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे सुप्रिमो शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली असून दोघांमध्ये कोणाचे नशिब साथ देणार हे दि. 6 रोजी दिसणार हे पहायला मिळणार आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये सहकार पेनेल होण्यापूर्वी राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील, राजेश राजपुरे आणि शिवरुपराजे खर्डेकर हे तिघे बिनविरोध झाले होते तर अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाचे खासदार उदयनराजे, भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर आणि खंडाळय़ाचे दत्तानाना ढमाळ हे बिनविरोध झाले होते. त्यानंतर सहकार पॅनेलमध्ये भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व मंडळी यांनी प्रचार केला अन् 10 जागांसाठी 20 उमेदवारांमध्ये निवडणूक झाली. त्या झालेल्या निवडणुकीमध्ये सहकार पॅनेलच्या तीन जागांना पराभव पत्कारावा लागला. त्यामध्ये एकेकाळी राष्ट्रवादीत असलेले प्रभाकर घार्गे यांनी नंदकुमार मोरे यांचा पराभव केला तर शेखर गोरे यांनी चिठ्ठीवर सहकार पॅनेलमधील राष्ट्रवादीचे मनोज पोळ व कोरेगाव येथील शिवाजी महाडिक यांचाही सुनील खत्री यांनी पराभव केला. तसेच जावलीतून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव एका मताने राष्ट्रवादीचे ज्ञानदेव रांजणे यांनी केला. त्यामुळे राजकारण ढवळून निघाले. दुसऱया बाजूला राज्यात महाविकास आघाडी असलेले समिकरण जिल्हा बँकेत मात्र काँग्रेसचे ऍड. उदयसिंह उंडाळकर यांच्या विरोधात पालकमंत्री बाळासाहेब पाटील अशी लढत झाली. शिवसेनेचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे सत्यजितसिंह पाटणकर यांच्यामध्ये लढत झाली. त्यामुळे जिल्हा बँकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असली तरीही त्यामध्ये अध्यक्षपदाच्या निवडीमध्ये राष्ट्रवादीतून राजेश राजपुरे, सत्यजितसिंह पाटणकर, नितीन पाटील यांची नावे पुढे येत आहेत. तर भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे यांच्याही नावाची चर्चा सुरु असून त्यांनीही नुकतीच शरद पवार यांची भेट घेवून इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे नेमकी संधी कोणाला मिळणार हे मात्र दि. 6 रोजीच स्पष्ट होणार आहे.