
मिलिटरी अपशिंगे – सविता कारंजकर यांच्याकडे मदत देताना प्राचार्य सुप्रिया निकम समवेत मान्यवर
स्थैर्य, सातारा, दि.18 ऑक्टोबर : सातार्यात लवकरच 99 वे साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनात खारीचा तरी वाटा माझा असावा, यासाठी समाजातील विविध स्तरातून देणगीचा ओघ वाढत आहे. विशेषत: विविध शाळांमधील मुले, शिक्षकांमधून देणगी देण्यासाठी नियोजन सुरु आहे. त्यातूनच मिलिटरी अपशिंगे येथील एएसपी कॉन्व्हेंट शाळेच्या वतीने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास 33475 रुपयांची रोख स्वरुपात मदत सुपुर्द करण्यात आली.
सातारा तालुक्यातील अपशिंगे मिलिटरी येथे एएसपी कॉन्व्हेट इंग्लिश स्कूल आहे. इंग्रजी शाळा असली तरी मातृभाषेशी नाळ जोडलेली असावी यासाठी ज्यावेळेस सातार्यात साहित्य संमेलन होणार असल्याची जाहीर झाले तेव्हा शाळेच्या प्राचार्या सुप्रिया निकम यांनी शिक्षकांशी चर्चा केली आणि विद्यार्थ्यांनाही याबाबत माहिती सांगितली. साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीतील सदस्यांनी ज्यावेळेस शाळेस भेट देऊन संमेलनाबाबत माहिती सांगितली त्यावेळेस प्राचार्य निकम यांनी एएसपी कॉन्व्हेट इंग्लिश स्कूलतर्फे देणगी देण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी देणगी गोळा केली आणि 33 हजार 475 रुपये रोख स्वरुपात देणगी दिली.
ही देणगी साहित्य संमेलनातील कवी कट्टा समन्वयक सविता कारंजकर, सचिन सावंत, सतीश घोरपडे, राजेंद्र जगताप उपस्थित होते. ही देणगी देऊन मराठी भाषा आणि सातार्याच्या मातीशी असलेली आपुलकी त्यांनी दाखवून दिली.
एएसपी कॉन्व्हेट इंग्लिश स्कूलने दिलेल्या देणगीची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष मंत्री श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना कळताच त्यांनी एएसपी कॉन्व्हेट इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे, प्राचार्य, शिक्षकांचे कौतुक केले. या उपक्रमाचे अनुकरण जिल्हयातील इतर मराठी, इंग्रजी शाळांनी करावे अशी अपेक्षा व्यक्त करेत संपूर्ण शाळेने एकत्रित देणगी देण्याचा पॅटर्न साहित्य संमेलनाच्या निमित्ताने रुजावा, असा मानस व्यक्त केला. या संमेलनासाठी सर्वांनी आवश्यक यावे. या संमेलनातून विद्यार्थी, शिक्षकांनी ऊर्जा मिळेल. 99 व्या मराठी साहित्य संमेलनासाठी कोणतीही मदत लागली तर आमच्या शाळेचे शिक्षक, विद्यार्थी व संस्थेचे पदाधिकारी पडेल ते काम करण्यास तयार आहेत, अशी ग्वाही शाळेच्या प्राचार्या सुप्रिया निकम यांनी यावेळी दिली.