स्थैर्य, पुणे, दि. 06 : राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री ना. अस्लम शेख यांनी ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या पुणे जिल्ह्यातील, मुळशी तालुक्यातील भांबार्डे गावचा दौरा करुन परिस्थिचा आढावा घेतला.
‘निसर्ग’ चक्रीवादळचा पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात सर्वाधिक फटका बसला. मुळशी तालुका कोकण भागाला अत्यंत जवळ आहे, ताम्हिणी घाट ओलांडल्यावर कोकण हद्द सुरु होते त्यामुळे साहजिकच या भागात घाटमाथ्यावर वादळाचा परिणाम होऊन मोठा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानेही वर्तवली होती.
चक्रीवादळामुळे मुळशी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांमध्ये घर, झाडे, विजेच्या पोलचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे तालुक्यातील पश्चिम पट्टा सध्या अंधारात आहे. अनेक शेतकऱ्यांची खाचरे पाण्याने तुडूंब भरल्याने भाताच्या दुबार पेरणीचे संकट बळीराजावर ओढवले आहे.
ना. अस्लम शेख म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारचा एक जबाबदार मंत्री या नात्याने मी भांबार्डे गावात आलो आहे. चक्रीवादळामुळे लोकांच्या घरांवरील पतरे व छप्पर उडून गेले आहेत. लवकरात – लवकर घरांवर पत्रे व छप्पर बसवण्याचे आदेश मी प्रशासनास दिले आहेत. विजपुरवठा पुर्ववत होईपर्यंत केरोसिनचा पुरवठा करण्याच्या सूचना प्रशासनास करण्यात आलेल्या आहेत. तसेच लोकांना जेवणाच्या किटचा देखील पुरवठा करण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे विजेच्या खांबांचेही फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विजपुरवठा पुर्ववत होण्यासाठी येथील प्रशासन युद्धपातळीवर काम करीत आहे.
यावेळी मुळशी तालुक्याचे तहसिलदार श्री अभय चव्हाण, विभागीय उपायुक्त मत्स्यव्यवसाय श्री देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.