स्थैर्य, सोलापूर, दि. १०: जिल्ह्यात मागील वर्षी अचानक अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हे नुकसान टाळण्यासाठी सर्वांनी योग्य नियोजन करावे. तालुक्याला, गावाला कोणत्या वस्तूंची कमतरता आहे, याची आगाऊ मागणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.
मान्सूनपूर्व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ऑनलाईनद्वारे सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, नगरपालिका मुख्याधिकारी सामील झाले होते.
श्री. शंभरकर म्हणाले, मागील वर्षी परिणाम झालेले गावे, बोटी यांची माहिती घेऊन यादी बनविणे. अचानक तारांबळ उडू नये, यासाठी पूर्व तयारी करा. पूर आलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा द्या. तालुकास्तरावरील सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. पंढरपूर शहराने कायम सतर्क रहावे, नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्याशी संपर्क करून योग्य नियोजन करावे. अक्कलकोट, माळशिरस, सांगोला, मंगळवेढा, माढा तालुक्यानेही सतर्क राहून योग्य नियोजन करावे. मनुष्यहानी होणार नाही, याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
श्री. स्वामी यांनी सांगितले की, तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी बाधित गावे, पूर, अतिवृष्टी यादृष्टीने टीम तयार कराव्यात. तालुकास्तरावर वारंवार बैठका घ्या, ग्रामस्तरावरील नैसर्गिक आपत्ती निवारण समिती कार्यरत करा. पोहणारे, खाजगी बोटी, होड्या यांची माहिती अद्ययावत करा. संपर्क तुटणारी गावे आणि त्यांच्यासाठी पर्यायी रस्त्याचे नियोजन, औषधे, धान्य यांचा पुरवठा करण्याबाबत योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
श्री. वाघमारे यांनी बैठकीचा उद्देश सांगून तालुकास्तरावर बैठक घेऊन आराखडा अद्ययावत करण्याच्या सूचना दिल्या. पूर्व सूचना मिळण्यासाठी पूर्वसूचना गटाची स्थापना करून प्रशासनाने स्थानिक पातळीवर संदेशाचे वहन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.