
स्थैर्य, फलटण, दि. १९ नोव्हेंबर : फलटण नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ मधील लढत अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे, याचे प्रमुख कारण म्हणजे येथील ज्येष्ठ आणि अनुभवी उमेदवार अशोकराव जाधव. गेली तब्बल २५ वर्षे मलठण भागातून निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर असून, यंदाही हा निवडणुकीचा रेकॉर्ड मोडण्याचा संकल्प घेऊन ते मैदानात उतरले आहेत. सतत रात्रंदिवस मलठणकरांच्या सेवेत असणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे, त्यामुळे या लढतीत त्यांचे पारडे जड असल्याचे जनतेतून बोलले जात आहे.
अशोकराव जाधव यांचे संघटन कौशल्य केवळ निवडणुकीपुरते मर्यादित नाही. गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव अशा सार्वजनिक महोत्सवांमध्ये त्यांचे प्रभावी नेतृत्व दिसून येते. त्यांच्या याच गुणांमुळे लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी त्यांना पहिल्यांदा सन २००१ मध्ये संधी दिली आणि तेव्हापासून त्यांनी मागे वळून पाहिले नाही. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ त्यांनी मलठण भागात अनेक विकासकामे मार्गी लावली असून, ते कायमच विकासकामांमध्ये अग्रेसर राहिले आहेत.
सध्याच्या निवडणुकीतही अशोकराव जाधव यांना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वाची मोठी ताकद मिळाली आहे. प्रभाग जरी बदलला असला तरी खासदार गटाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक म्हणून ते कायम चर्चेत असणारे नेतृत्व आहेत. मोठ्या नेत्यांचा विश्वास आणि स्वतःचा २५ वर्षांचा अनुभव, या जोरावर ते मतदारांमध्ये आपला प्रभाव कायम ठेवून आहेत.
एकंदरीत, प्रभाग क्रमांक ७ मध्ये अशोकराव जाधव यांच्यासमोर प्रतिस्पर्धी उमेदवाराचे आव्हान असले तरी, सलग २५ वर्षांचा लोकसंपर्क आणि विकासातील योगदान यामुळे त्यांचे स्थान मजबूत आहे. मलठणकरांचे त्यांच्यावरील प्रेम आणि निष्ठा या बळावर अशोकराव जाधव आपला विजयाचा संकल्प पूर्ण करतील, असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. प्रभाग ७ मध्ये ‘अनुभव बोलतो’ असे चित्र असून, जाधव यांचा विजय झाल्यास तो पालिका निवडणुकीतील विक्रमी विजय ठरेल.

