
-
“मी सर्वसामान्य कार्यकर्ता, २५ वर्षांची निष्ठा आणि सेवा हेच माझे भांडवल”
-
विरोधकांच्या ३० वर्षांच्या सत्तेवर आणि कारभारावर जाधवांची टीका
-
प्रभाग ७ मध्ये विकासाला आणि जनसेवेला साथ देण्याचे अशोकराव जाधवांचे आवाहन
स्थैर्य, फलटण, दि. २८ नोव्हेंबर : “मी एक सर्वसामान्य घरातील कार्यकर्ता आहे. लोकनेते स्व. हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून गेली २५ वर्षे मी मलठणकरांची निस्वार्थ सेवा करत आहे. या निवडणुकीत मतदारांनी पैशाला बळी न पडता, अहोरात्र आपल्या हाकेला धावून येणाऱ्या कार्यकर्त्याला साथ द्यावी,” असे भावनिक आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक ७ चे उमेदवार अशोकराव जाधव यांनी केले आहे.
निष्ठेच्या जोरावर निवडणूक लढवणार
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना जाधव म्हणाले, “माझ्याकडे गडगंज संपत्ती नाही, पण लोकांचे प्रेम आणि पक्षावर असलेली निष्ठा हीच माझी खरी संपत्ती आहे. हीच निष्ठा या निवडणुकीत माझ्या कामी येणार आहे. नागरिकांनी २४ तास उपलब्ध असणाऱ्या आणि सुख-दुःखात साथ देणाऱ्या माणसाला निवडून द्यावे.”
विरोधकांवर निशाणा
यावेळी त्यांनी विरोधकांवर (राजे गट) टीका करताना सांगितले की, “गेल्या ३०-३५ वर्षांच्या अमर्याद सत्तेतून आणि टेंडरच्या माध्यमातून जमा झालेला पैसा आज निवडणुकीत बाहेर येत आहे. मात्र, सुज्ञ मलठणकर नागरिक या पैशाला न भुलता विकासाला साथ देतील.”
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून प्रभागाचा कायापालट करण्यासाठी महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, अशी विनंतीही त्यांनी मतदारांना केली.

