
कार्यसम्राट नगरसेवक अशोकराव जाधव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार. लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांच्या विचारांचा वारसा आणि संघर्षाचे कौतुक.
स्थैर्य, फलटण, दि. २४ डिसेंबर : “कार्यसम्राट नगरसेवक अशोकराव जाधव यांची कामाची पद्धत आणि माणसे जोडण्याची हातोटी अत्यंत प्रभावशाली आहे. त्यांच्या याच स्वभावामुळे आणि कार्यामुळे प्रभावित होऊन आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता. निवडणुकीत जरी त्यांचा पराभव झाला असला, तरी आमच्यासाठी अशोकराव जाधव हेच नगरसेवक होते आणि यापुढेही राहणार आहेत,” अशी भावना सामाजिक कार्यकर्ते दीपकराव शिंदे यांनी व्यक्त केली.
अशोकराव जाधव यांच्याबद्दल बोलताना शिंदे म्हणाले की, लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांच्या तालमीत तयार झालेले अशोकराव हे अत्यंत संघर्षातून पुढे आलेले नेतृत्व आहे. त्यांनी आजपर्यंत विरोधी गटाला खंबीरपणे तोंड देत आपली राजकीय कारकीर्द घडवली आहे. त्यांच्या या संघर्षात आणि कामात आम्हाला नेहमीच प्रेरणा मिळाली आहे.
या निवडणुकीत अशोकराव जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, नवनियुक्त लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, तसेच ज्येष्ठ विधितज्ज्ञ नरसिंह निकम, बाळासाहेब भोसले, अशोकदादा भोसले, मोहन अण्णा रणवरे, राजाभाऊ घाडगे आणि प्रमोद आबा खलाटे यांसारख्या नेत्यांनी मोठी ताकद दिली. या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पाठिंब्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले.
दीपकराव शिंदे पुढे म्हणाले की, “स्वतः अशोकराव जाधव यांनी आमच्यावर प्रचंड विश्वास टाकला. त्यांनी कोणालाही न दुखावता ही निवडणूक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली. त्यांनी सर्वांची मने जिंकली, हेच त्यांचे सर्वात मोठे यश आहे. निकालात काहीही झाले तरी जनमाणसातील त्यांचे स्थान अढळ आहे. त्यांच्या समाजकार्याला आमची साथ कायम राहील.”
