
स्थैर्य, सातारा, दि. 01 : दरवर्षीप्रमाणे चातुर्मासाची सुरुवात होते ती आषाढी एकादशी पासून. यानिमित्त वैष्णव भक्तांना मध्ये एक वेगळेच चैतन्य असते. मात्र यावर्षी करोना आजाराच्या संकटामुळे देव देवळातच कोंडले गेले आणि भक्तांना त्याचे दर्शन आज आषाढी एकादशीलाही मंदिरा बाहेरूनच घ्यावे लागले.
आज आषाढी एकादशीनिमित्त सातारा जिल्ह्यातील विविध विठ्ठल मंदिरात विशेष पूजा करण्यात आली. सातारा शहरातील मंगळवार पेठेतील श्री गवई विठ्ठल मंदिर, यादोगोपाळ पेठ येथील श्री घाटगे विठ्ठल मंदिर, दिवशीकर बंधूचे श्री मुरलीधर मंदिर येथे सकाळीच षोडशोपचार पूजा, महाअभिषेक झाल्यानंतर आरती व नैवेद्य दाखवून विविध फुलांच्या हार आणि सुशोभित केलेले देवाचे रूप मात्र गाभाऱ्यातच केवळ मंदिरातील पुजार्यांना अनुभवता आले. इतर सर्व वैष्णव भक्तांसाठी मंदिराच्या बाहेरील लोखंडी दरवाजे बंद ठेवून त्या पुढेच दिवसभर रांगा लावून वैष्णव भक्तांनी आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेतले. हातात आणलेले पान, फूल, बुक्का हे लोखंडी दारापाशी ठेवलेल्या श्री विठ्ठल प्रतिमेला वाहून भक्तांनी देवापुढे हात जोडले. आतातरी आम्हा सर्वांची या संकटातून सुटका कर अशीच काही प्रार्थना आणि विनवणी केली.
श्री गवळी विठ्ठल मंदिरात मंदिराचे मालक शैलेश गवई व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.प्रज्ञा गवई यांचे हस्ते पहाटे विठ्ठलाची महापूजा करण्यात आली. दरवर्षी या ठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावून त्यांचे हस्ते करण्यात येणारी विठ्ठलाची महापूजा परंपरा मात्र यावर्षी खंडित झाली होती.
मंदिराबाहेर उभा असलेला विठ्ठल अभंग म्हणणारा वासुदेवही आज तोंडाला मास्क लावूनच हरी किर्तन करताना दिसत होता. यावर्षी दर आषाढी एकादशीला साजरी होणारी महिला मंडळाची सांप्रदायिक भजने, मान्यवरांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा, सांप्रदायिक कीर्तन, हरिपाठ, हरिजागर, आदी कार्यक्रमांना मात्र पूर्णपणे बंदी असल्याने मुद्दामच फाटा देण्यात आला. विविध मंदिरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सातारा येथील श्री बकरे विठ्ठल मंदिर, कमानी हौद श्री विठ्ठल मंदिर, मंगळवार पेठेतील गवंडी आळी विठ्ठल मंदिर, संगम माहुली येथील श्री राही रखुमाई विठ्ठल मंदिर, जावली तालुक्यातील पाचगणी नजीकच्या प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र करहर विठ्ठल मंदिर गोंदवले येथील श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे जन्मस्थान परिसरात असणारे श्री विठ्ठल मंदिर यासोबत कराड, फलटण, वाई, महाबळेश्वर आदी ठिकाणच्या विठ्ठल मंदिरात पूजा-अर्चा करुन मंदीरात दर्शनासाठी बंद होती. भक्तांनी ही लॉकडाऊनमुळे बाहेरूनच दर्शन घेऊन समाधान मानले.