स्थैर्य, पुणे, दि.२९: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी आपण सामना करत आहोत. राज्यातील कोरोना संसर्गाचा आलेख कमी होत असला तरी तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह, वारकऱ्यांच्या आरोग्याचा विचार आपल्याला करणे आवश्यक आहे. वारकरी संप्रदायातील मान्यवरांची मते आज जाणून घेण्यात आली आहेत, वेळप्रसंगी अधिक चर्चा करुन आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबतचा अंतिम निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करुन पालखी सोहळ्याबाबत त्यांची मते जाणून घेतली. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (व्हीसीद्वारे), आमदार अतुल बेनके, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते. तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंग, सोलापूर जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, देहू संस्थानचे विश्वस्त माणिक मोरे, नितीन मोरे, पालखी सोहळा प्रमुख संजय मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अँड विकास ढगे-पाटील, अभय टिळक यांच्यासह राज्यभरातील वारकरी संप्रदायातील पालखी सोहळा प्रमुख व मान्यवर उपस्थित होते.