स्थैर्य, नाशिक, दि.१४: जिल्हा रुग्णालयात एका भामट्याने दीड वर्षाच्या चिमुकलीला पळवून नेल्याच्या घटनेला 24 तास उलटून गेले आहेत. तरीही या भामट्याच्या शोध लावण्यात नाशिक पोलिसांना यश आलेलं नाही. नाशिक जिल्हा रुग्णालयात शनिवारी एका भामट्याने आईची नजर चुकवत एका चिमुकलीला पळवून नेलं आहे. मुलीला पळवून नेत असताना सदरील व्यक्ती सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पण त्याचा शोध अद्याप लागू शकलेला नाही.
आईने लक्ष ठेवायला सांगितलं, पण…
प्रतिभा गौड असं अपहरण झालेल्या दीड वर्षाच्या चिमुकलीचं नाव आहे. चिमुकलीची आई संगीता गौड आपल्या बहिणीच्या प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात आली होती. रुग्णालयातील सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी संगीता गौड यांची धावपळ सुरु होती. त्यावेळी मुलगी झोपल्याने संगीता यांनी चिमुकलीला प्रसूती कक्षाबाहेर झोपवले. तिथे बाजूला बसलेल्या एका व्यक्तीला मुलीकडे लक्ष देण्यास सांगितलं आणि संगीता आपल्या बहिणीचा रिपोर्ट सादर करण्यासाठी गेल्या. त्यावेळी या भामट्याने मुलीला खांद्यावर घेत रुग्णालयात पलायन केलं. चिमुकलीच्या अपहरणाचा हा प्रकार सीटीटीव्हीत कैद झाला आहे.
नातेवाईकांचा रुग्णालय प्रशासनावर आरोप
घटनेची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालय प्रशासनानं पोलिसांनी संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनीही सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध सुरु केला आहे. पण या घटनेला 24 तास उलटून गेल्यानंतरही पोलिसांना या आरोपीचा शोध लागलेला नाही. संगीता गौड आपल्या बहिणीला रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन आल्या होत्या. पण रुग्णालय प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे संपूर्ण प्रक्रियेला मोठा कालावधी लागला. जिल्हा रुग्णालयाने वेळीच उपचारासाठी दाखल करुन घेतलं असतं तर ही घटना घडली नसती असा आरोप चिमुकलीच्या नातेवाईकांनी केला आहे.
नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
दरम्यान, कालपासून नाशिक पोलिसांनी जागोजागी नाकाबंदी करुन आरोपीचा शोध सुरु केला आहे. सीसीटीव्हीच्या आधारावर पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. पण अद्याप पोलिसांना या प्रकरणात यश आलेलं दिसत नाही. या घटनेमुळे नाशिक शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. लहान मुलांचं अपहरण करणारी टोळी तर सक्रिय झाली नाही ना? अशी भीती आता सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.