दैनिक स्थैर्य । दि.१० फेब्रुवारी २०२१ । सातारा । पंतप्रधान आवस योजनेंतर्गत प्रत्येकाला आपल्या घरकुलाचे स्वप्न पुर्ण करता यावे याकरीता घरकुल योजना जाहिर करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत सन् 2022 करीता अर्ज मागविण्यात आले होते. जिल्हय़ात एकुण 87 हजार 257 इतके अर्ज दाखल करण्यात आले आहेत. सध्या या अर्जांची पडताळणी सुरू असुन येत्या मार्च अखेर पर्यंत किती अर्ज पात्र व किती अपात्र याची माहिती मिळणार आहे. याच घरकुलाचे काम हे त्या-त्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांकडे देण्यात आले आहे, सध्या या अभियंत्यांना तुटपुंजे वेतन असल्याने आम्हाला कायमस्वरूपी वेतन जाहिर करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
मागील अनेक वर्षापासुन घरकुल योजना राबविण्यात येत असुन 20 नोव्हेंबर 2021 पासुन महाआवास योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे काम संबंधीत ग्राम पंचायत अंतर्गत अभियंता नेमुन त्यांच्याकडे देण्यात आले आहे. मागील अनेक वर्षे या अभियंत्यांना 750 रूपये इतके मानधन देण्यात येत होते. याबाबत अनेक निवेदने देवुन यामध्ये केवळ 200 रूपये इतकी वाढ करून सध्या 950 रूपये इतके मानधन देण्यात येत आहे. अनेकदा त्यांचे वेतन वेळेत ही होत नाही, त्यामुळे आम्हाला कायमस्वरूपी वेतन जाहिर करावे, अशी मागणी या अभियंत्यांकडुन करण्यात येत आहे.
कोरोना काळात ही या अभियंत्यांनी लाभार्थ्यांच्या घरी जावून योजने अंतर्गत माहिती गोळा केली होती. सध्या ग्राम पंचायती अंतर्गत दाखल झालेल्या अर्जांची पडताळणी करण्यात येत आहे. घरकुल योजनेंतर्गत इतर कर्मचाऱयांना येग्य प्रमाणात वेतन देण्यात येते. त्यामुळे आमच्या ही वेतनात वाढ करण्यात यावी, अन्यथा आम्हाला कायमस्वरूपी वेतन देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. त्यातच मागील वर्षी एकुण 1 लाख 18 हजार 101 अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यापैकी 88 हजार 118 अर्ज हे पात्र ठरले होते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कमी अर्ज दाखल झाले आहेत. पण आता यापैकी किती अर्ज अपात्र ठरतात हे पहावे लागेल.