दैनिक स्थैर्य । दि. २० एप्रिल २०२३ । मुंबई । देशासह महाराष्ट्रातही कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाचे 25 समर्पित कोविड रुग्णालये कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.
राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठातांशी वैद्यकीय शिक्षणमंत्री यांनी आज संवाद साधला. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ. अश्विनी जोशी, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्यासह अधिष्ठाता आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोविडबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. यामुळे खबरदारी म्हणून सर्वांनी मास्क लावावा, तसेच वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सर्वांनी मास्क लावून काम करावे असे निर्देशही वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी दिल्या.
मंत्री श्री. महाजन म्हणाले की, सद्यस्थितीत वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत 5 हजारांहून अधिक कोविड खाटा आहेत. तर 2 हजारांहून अधिक व्हेंटिलेटर व आवश्यकता पडल्यास ऑक्सिजन करिता ६२ एलएमओ टँक्स, ३७ पीएसए प्लांट कार्यरत आहे. त्याच प्रकारे 2 हजार जम्बो आणि 6 हजार लहान सिलेंडर तयार आहेत.
प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात कोविड तपासणी सुविधा उपलब्ध असून एका दिवसात वैद्यकीय महाविद्यालयात 30 हजारांहून अधिक कोविड चाचण्या होऊ शकतात. भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दिनांक 10 व 11 एप्रिल रोजी प्रत्येक महाविद्यालयात कोविड मॉक ड्रिल घेण्यात आली आहे.
कोविड प्रादुर्भाव व प्रसार रोखण्याकरिता मास्कचा वापर हे प्रभावी साधन आहे. मास्कमुळे कोविडची लागण होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे अधिष्ठाता यांनी आपल्या महाविद्यालयात आणि रुग्णालयात काम करणारे डॉक्टर्स, परिचारिका, पॅरामेडिकल स्टाफ यांना मास्क लावून काम करण्यास सांगावे. याशिवाय ज्येष्ठ व्यक्तींचे लसीकरण करण्यावर भर द्यावा. येणाऱ्या काळात सर्व अधिष्ठाता यांनी सर्व महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या सोयीसुविधा, ऑक्सिजनची उपलब्धता, व्हेंटिलेटर्सची संख्या यांच्यासह तांत्रिक साहित्य तयार ठेवावे. रुग्णालयात प्रत्यक्ष काम करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना संरक्षणात्मक साधने उपलब्ध करुन द्यावी, अशा सूचनाही मंत्री श्री. महाजन यांनी दिल्या.
शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, ऑक्सिजनचा साठा, उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटर्सची संख्या, रेमीडिसीव्हीरची उपलब्धता, रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी उपाययोजना, गरज पडल्यास अतिरिक्त डॉक्टर्सची उपलब्धता अशा विविध विषयांचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला.