अरविंद मेहता कोणाचे मिंधे नाहीत, म्हणून सर्वांना एकत्र आणू शकतात – ह.भ.प. बंडातात्या कराडकर


स्थैर्य, फलटण, दि. ०७ सप्टेंबर : “नसावे ओशाळ, मग मानिती सकळ !” या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देत, “या अभंगातच अरविंद मेहता यांचे संपूर्ण जीवन सामावलेले आहे. ते कोणाचे मिंधे नसल्यानेच सर्व राजकीय नेत्यांना एकत्र आणण्याची नैतिक क्षमता त्यांच्यामध्ये आहे,” असे गौरवोद्गार युवक मित्र ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी काढले.

ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता व सौ. इंदुमती मेहता यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात ते मार्गदर्शन करत होते. पुढे बोलताना बंडातात्यांनी एक अनोखी सूचना केली. ते म्हणाले, “मेहता यांचा अमृत महोत्सव किंवा वाढदिवस दरवर्षी साजरा करावा, म्हणजे तालुक्यातील सर्व नेते एकत्र येत राहतील, विकासाचे चांगले चित्र निर्माण होईल आणि सर्वसामान्यांचे हित जपले जाईल.”

या कार्यक्रमास आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, आमदार महादेवराव जानकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ठ पत्रकार वसंतराव भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्राच्यावतीने अरविंद मेहता व सौ. इंदुमती मेहता यांचा विशेष सन्मान करण्यात आला. संघाचे मार्गदर्शक विलास बाबा जवळ यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. त्यानंतर बंडातात्या कराडकर यांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पेढ्यांचा हार घालून मेहता दांपत्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघाचे अध्यक्ष दीपक जाधव, नंदकुमार कुमठेकर, तुषार जगताप देशमुख यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!