
सातारा – संगीत महोत्सवात गायन सादर करताना अभयसिंह वाघचौरे. त्यावेळी संवादिनीवर स्वानंद राजोपाध्ये, तबला वादन करताना राघव नरेवाडीकर. (छाया – अतुल देशपांडे)
स्थैर्य, 5 फेब्रुवारी, सातारा : श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या सज्जनगड येथील दासनवमी संगीत महोत्सवांमध्ये एकल तबलावादन कार्यक्रमात आपल्या कार्यक्रमाची सुरुवात राघव नरेवाडीकर याने अतिशय बहारदारपणे सादर केली. यामध्ये तीन ताल, पेशकार, कायदे, रेला ,तुकड्यांच्या रचना सादर करून उपस्थितांच्या टाळ्या स्वीकारल्या .यावेळी राघव यास स्वानंद राजोपाध्ये यांनी संवादिनीवर अतिशय सुरेख साथ केली.
राघव यांनी आपले तबल्याचे प्राथमिक शिक्षण राजेंद्र आफळे व सचिन राजोपाध्ये यांचेकडे घेतले. सध्या ते पं. रामदास पळसुले यांचेकडे पुढील तबलावादनाचे धडे घेत आहेत .राघव नरेवाडीकर हे सध्या आपले एमटेक शिक्षण पूर्ण करून बॉस या कंपनीमध्ये नोकरीस असून विविध स्पर्धेत त्यांनी तबलावादनाची पारितोषिक मिळवली आहेत .पं.रामदास पळसुले यांचेकडे पुढील शिक्षण घेत आहेत.अनेक ज्येष्ठ मान्यवर गायक यांना साथ संगत करताना अतिशय सात्विक स्वरूपातील हा तबलावादक दररोज दासबोधातील एक समास वाचल्याशिवाय झोपतही नाही ,यासाठी आई-वडिलांचे तसेच समाजाचे हे एक मोठे भविष्य काळातील चांगले ध्येय असल्याचेच निवेदन यावेळी राजेंद्र आफळे यांनी केले.
साथ संगत करणार्या स्वानंद राजपाध्ये याने आपल्या मातोश्री सौ .स्वरदा राजोपाध्ये तसेच वडील सचिन राजोपाध्ये यांचेकडून संवादिनीचे प्राथमिक धडे घेऊन,आत्तापर्यंत त्यांनी तन्मय देवचक्के, योगेश समसी, श्रुती सडोलीकर, सावनी तळवळकर यासारख्या मान्यवर गायकांना साथसंगत केलेली आहे.
त्यानंतर उत्तरार्धात गुरु पंडित सुधाकर चव्हाण यांचे शिष्य असलेल्या अभयसिंह वाघचौरे यांनी आपल्या गायन सेवेचा प्रारंभ यमन रागातील विलंबित एकतातील ..काही सखी ..या बंदिशी ने केला त्यानंतर तीन तालातील छोटा खयाल सादर करताना ..श्याम बजाये आज मुरलिया.. सुरेखपणे सादर केले .
पंडित सुधाकर चव्हाण यांच्याकडे गेल्या 16 वर्षांपासून शास्त्रीय संगीताचे शास्त्रोक्त शिक्षण घेणारे अभयसिंह वाघचौरे हे एक आश्वासक शास्त्रीय गायक आहेत. त्यांनी 2019 मध्ये ’संगीत विशारद’ आणि 2026 मध्ये ’संगीत अलंकार पूर्ण केले असून सध्या ते भारती विद्यापीठ, पुणे येथून संगीतात पदव्युत्तर (च-) शिक्षण घेत आहेत. 2015 सालचे केंद्र सरकारचे ’उउठढ’ स्कॉलर आणि अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाचे ’गुणवंत विद्यार्थी’ असलेल्या अभयसिंह यांनी कलर्स मराठीवरील ’सूर नवा ध्यास नवा’ (2022) मधील ’सुरेल 16’ मध्ये स्थान मिळवून आपली मोहोर उमटवली आहे. त्यांना पद्मभूषण पंडित अजय चक्रवर्ती यांच्यासमोर सादरीकरण करण्याची दुर्मिळ संधी मिळाली असून, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी महोत्सव आणि स्वरसागर महोत्सवांसारख्या प्रतिष्ठित मंचांवरही त्यांनी आपली कला सादर केली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात नियमित मैफिली गाण्यासोबतच ते ’जिक्र-ए-अशार’, ’बझ्म-ए-जाना’, अस्मिता महाराष्ट्राची, मेघश्याम, तेजोनिधी सावरकर यांसारख्या वैशिष्ट्यपूर्ण थीमॅटिक कार्यक्रमांत आणि पार्श्वगायन तसेच रेकॉर्डिंग क्षेत्रातही सक्रिय आहेत.
उपशास्त्रीय गायन प्रकारात समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या ..आरंभी बंदीन आयोध्येचा राजा ..सादर करून ..जानकीनाथ सहाय रे.. सादर केले पंडित कुमार गंधर्व यांनी सुप्रसिद्ध केलेल्या ..अवधूता कुदरत की गती न्यारी.. या निर्गुणी भजनाचे सुरेख सादरीकरण करत पुन्हा एकदा समर्थांच्याच ..जो जो भजनी रंगला तो तो रामदास झाला.. सादर करून ..देवाघरचे ज्ञात कुणाला ..सादर केले …हरी म्हणा ,तुम्ही गोविंद म्हणा ..सादर करत ..धन्यवाद का सेवा अवसर पाया.. या भैरवीने आपल्या गायन सेवेची सांगता केली .
अभयसिंह यांना यावेळी तबल्यावर साथ राघव नरेवाडीकर यांनी केली तर संवादिनीवर अतिशय सुरेख साथ स्वानंद राजोपाध्ये यांची होती .या कार्यक्रमाचे निवेदन अतिशय बहारदारपणे ज्येष्ठ संगीततज्ञ राजेंद्र आफळे यांनी केले. या सर्व गायक व वादक कलाकारांचा सत्कार श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने ज्येष्ठ निरूपणकार डॉ.अजित कुलकर्णी यांच्या हस्ते रामनामी ,समर्थ प्रसाद देऊन करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी यांनी केले. या कार्यक्रमास संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर देशातून उपस्थित असलेल्या समर्थ भक्तांची मोठी उपस्थिती होती .
सज्जनगड येथे शुक्रवार, दि. 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता मंडळाचे अध्यक्ष समर्थ भक्त गुरुनाथ महाराज कोटणीस यांचे प्रवचन ,सायंकाळी चार वाजता पनवेल येथील नंदकुमार कर्वे बुवा यांचे सुश्राव्य कीर्तन आणि सायंकाळी साडेसहा वाजता सौ .श्रद्धा जोशी व सौ. श्रुती गोडबोले, ठाणे यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन होणार आहे.

