दैनिक स्थैर्य । दि.२८ मार्च २०२२ । सातारा । ग्रामीण भागातील कलाकार हा निर्मितीक्षम आहे. ग्रामीण संस्कृती टिकवणे हे आपल्या हातात आहे. ग्रामीण भागात कसदार कलाकार आहेत म्हणूनच ग्रामीण भागातील कलावंतांनी पुढे येणे गरजेचे आहे. प्रमाणभाषेचे दडपण घेवू नये. बोली भाषेत लिहावं , सादरीकरण करावे हे योग्यच आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील नाट्य कलावंतांनी पुढे येऊन टॉक शो किंवा ग्रामीण टच असलेले नाट्य करावे असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत कांबिरे यांनी सातारा येथे बोलताना व्यक्त केले.
जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून साठाव्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्यस्पर्धेत सांगली केंद्रात बक्षीस मिळवलेल्या सातारा तालुक्यातील कुसवडे येथील विजय मांडके सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालय या संस्थेच्या वतीने सादर केलेल्या आई बाबा आणि ती या दोन अंकी नाटकातील बक्षीस मिळवलेल्या कलावंतांचा तंत्रज्ञांचा लेखाचा गौरव करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी चंद्रकांत कांबिरे बोलत होते यावेळी विजय मांडके , ज्येष्ठ रंगकर्मी दिपक देशमुख , संगीतकार बाळासाहेब चव्हाण , मारुती जगताप , लखन जगताप हे उपस्थित होते. प्रारंभी दीपक देशमुख व चंद्रकांत कांबिरे यांच्या हस्ते नटराज पूजन झाले. चंद्रकांत कांबिरे यांनी यावेळी काही कविता सादर केल्या. यावेळी बोलताना दीपक देशमुख यांनी कलावंतांना शुभेच्छा दिल्या व भविष्यकाळात सहकार्याचे आश्वासन दिले. विजय मांडके यांनी प्रकाश योजनेचे द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळवलेल्या आकाश दळवी , स्त्री अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र मिळविलेल्या कु. पायल कदम , तसेच नाट्यलेखक विक्रम बल्लाळ व नाटकातील सर्व कलावंतांचे अभिनंदन केले . लखन जगताप यांनी आगामी काळात जागृत कलामंच व विजय मांडके सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने सादर करण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती प्रास्ताविकात दिली संस्थेचे अध्यक्ष महेश गुरव यांनी आभार मानले. यावेळी लेखक विक्रम बल्लाळ ,नम्रता धनावडे,समीर मुलाणी,चेतन पाटेकर, शुभम पाठक आदी उपस्थित होते.