कास पठार समितीकडून वन्यजीवांसाठी कृत्रिम पाणवठे


स्थैर्य, 16 मार्च, सातारा : सुरू झालेल्या रखरखत्या उन्हाळयात मानवाप्रमाणेच प्राण्यांच्याही अंगाची लाही लाही होत असताना जंगलातील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत संपूर्ण आटले आहेत. अशात वन्यजीवांना आणि पशुपक्ष्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असून पाणी पिण्यासाठी हे प्राणी मानवी वस्तीत जात असल्याने वन्यजीव आणि मानवात संघर्ष होत असून हे टाळण्यासाठी कास पठार वन व्यवस्थापन समितीच्या वतीने कासच्या जंगल परिसरात वन्यजीवांसाठी कृत्रिम  पाणवठे  तयार करण्यात आले आहेत. यामुळे वन्य प्राण्यांना आणि पशू पक्षांना जंगलातच पिण्यासाठीपाणी उपलब्ध होणार आहे.
कास पठार समितीचा सर्वात चांगला उपक्रम असून दरवर्षी कास पठार परिसरात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वन्यप्राण्यांच्या पाण्याच्या गरजा भागवण्यासाठी समितीच्या वतीने वनपरिसरात सुमारे ४० ते ५०  पाणवठे  तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये नियमितपणे पाणी सोडले जात आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत जंगल परिसरातील नैसर्गिक पाणीस्रोत आटू लागतात. त्यामुळे वन्यप्राण्यांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागते. ही अडचण लक्षात घेऊन कास पठार समितीने वनविभागाच्या सहकार्याने विविध ठिकाणी पाणवठे तयार केले आहेत.
या पाणवट्यांमध्ये टँकर किंवा इतर माध्यमातून पाणी भरून वन्यप्राण्यांना पिण्यासाठी उपलब्ध करून दिले जाते. जंगलातील बिबटे, भेकर, हरण, ससे, माकडे, अस्वल, गवा, सरपटणारे प्राणी, पशुपक्षी तसेच इतर लहान-मोठ्या वन्यप्राण्यांना मोठा दिलासा मिळणार असून जंगलातच त्यांना बाहेर उन्हाळ्यात पाणी उपलब्ध होणार आहे. पर्यावरण संवर्धनाबरोबरच वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी समितीचा हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे.


Back to top button
Don`t copy text!