कलेचा वारसा जोपासण्यासाठी कलाप्रेमींनी पुढाकार घ्यावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १२ डिसेंबर २०२१ । मुंबई । देशात अनेक प्रकारच्या कला अस्तित्वात असून हा प्राचीन कलेचा मोठा वारसा या भूमीला लाभलेला आहे. हा वारसा आणि कला संस्कृती जोपासण्यासाठी कलाप्रेमींनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

मुंबईच्या फोर्ट येथील जहांगीर कला दालनात ललित कला अकादमीतर्फे आयोजित द्वितीय ‘आंतरराष्ट्रीय प्रिंट द्विवार्षिकी भारत’ या प्रदर्शनातील विजेत्यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते.

मानवी भाव-भावना कलेच्या माध्यमातून व्यक्त करणे ही दैवीशक्तीच आहे. कलाकारांची भावना समजून घेण्यासाठी कलेची आवड असणेही तितकेच गरजेचे आहे. देशाला अनेक युगांपासून कला-संस्कृती लाभलेली आहे. आजच्या घडीला ही कला, संस्कृती जोपासण्यासाठी अनेक कलाकार पुढे येत आहेत. संगीत ज्या प्रमाणे समजून घेता येते, त्याप्रमाणे कलेला समजून घेणे कठीण आहे. त्यासाठी कलेची आवड निर्माण होणे तितकेच आवश्यक आहे. देशात विविध कला आहेत. ही कला-संस्कृती पुढे चालत राहावी यासाठी कलाकारांनी नवनवीन कलांच्या माध्यमातून नवा समाज घडविण्याची गरजही राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केली.

याप्रसंगी पारितोषिक विजेत्यांचे अभिनंदन करून खासदार गोपाल शेट्टी म्हणाले की, कलाकारांचा सन्मान करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. भविष्यात मोठे कलाकार निर्माण करण्यासाठी आणि कला संस्कृतीला अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येवून योगदान देण्याची आवश्यकताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

ललित कला अकादमीचे अध्यक्ष डॉ.उत्तम पाचरणे म्हणाले की, या प्रदर्शनाचे हे दुसरे वर्ष असून यामध्ये एकूण ३१७ कलाकृती सादर करण्यात आल्या होत्या त्यापैकी १४९ मुद्राचित्रांची निवड करून त्या कला रसिकांसाठी प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. प्रसिद्ध चित्रकार सोमनाथ होर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या निवडक कलाकृतींसह  देशविदेशातील कलाकृतींचाही यामध्ये समावेश आहे. या प्रदर्शनात अमेरिका, रशिया, जर्मनी, इस्रायल, नेपाळ, मेक्सिको, नेदरलँड, अर्जेंटिना, फ्रान्स, पेरू, पोलंड येथील कलावंतांची मुद्राचित्रे कला रसिकांना पाहण्यासाठी 13 डिसेंबरपर्यंत उपलब्ध आहेत. हे प्रदर्शन मुंबईतील जे. जे. कला महाविद्यालयसह देशातील प्रमुख शहरांमध्येही प्रदर्शित केले जाणार आहे. ललित कला अकादमीकडे सुमारे 20 हजार चित्र उपलब्ध असून त्यासाठी चित्र संग्रहालय उभारले जाणार असल्याची माहितीही डॉ. पाचरणे यांनी यावेळी दिली.

यावेळी ज्येष्ठ कलाकार श्री. जयप्रकाश जगताप यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या आंतराष्ट्रीय प्रिंट प्रदर्शनात प्रत्येकी दोन लाख रुपयांची पाच परितोषिके दिली जातात, यावर्षी कलाकार जगदीश्वरराव तमिनेन्नी (रोप वे), चंद्रशेखर वाघमारे (अदृश्य ध्येय),  सुषमा यादव (स्त्रीमित्र कथा), दुर्गादास गराई (कळत नकळत दुर्दैव), मोहम्मद मजुमदार (ब्रेथ लाईफ इन टू ब्युटी) या पाच पारितोषिक विजेत्यांना दोन लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ललित कला अकादमीचे सचिव रामकृष्ण वेदेला यांनी आभार मानले. कार्यक्रमाला कलारसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!