मानाच्या पालख्यांचे वाखरीत आगमन; प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांनी केले स्वागत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १९ जुलै २०२१ । पंढरपूर । आषाढी एकादशीसाठी आज मानाच्या पालख्यांचे वाखरी येथे आगमन झाले. मानाच्या पालख्यांचे स्वागत जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तर विठ्ठल-रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार, कोरोनाच्या नियमांचे पालन करत आषाढी वारीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून मानाच्या पालख्यांचे आगमन वाखरी पालखी तळावर झाले. वाखरी पालखी तळावर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत सोपानदेव महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत मुक्ताबाई, संत एकनाथ महाराज, संत निळोबाराय, संत चांगावटेश्वर, विठ्ठल रुख्माई पालख्यांचे स्वागत करण्यात आले.

वाखरी पालखी तळावर पालख्यांचे आगमन होताच सर्व परिसर विठ्ठल नामाचा गजराने दुमदुमून गेला. मानाच्या पालख्यांच्या स्वागतासाठी पंढरपूरच्या नगराध्यक्ष साधना भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी, पंढरपूर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, वाखरीच्या सरपंच श्रीमती कविता पोरे आदींसह मंदिरे समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!