दैनिक स्थैर्य । दि. २० जुलै २०२१ । सातारा । भागवत परंपरेच्या दृष्टीने महत्वाच्या समजल्या जाणाऱया पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पादुका हिंदुस्थानाच्या पहिल्या दुर्ग राजधानीवरुन पंढरीत दाखल झाले होते. पंढरपुरात इतर मानाच्या पालख्या या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एसटीने दाखल झाल्या होत्या. पण यंदाही शिवरायांच्या पादुकांची पालखी ही पायीच पंढरपुरात सोमवारी सायंकाळी दाखल झाली. मागील सात वर्षाची परंपरा यंदाही अखंडपणे पार पडली आहे.
यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी केवळ पाचच शिवभक्तांच्या समवेत ही पालखी मार्गस्थ झाली होती. यामध्ये योगऋर्षी सुधीर इंगवले, ह.भ.प. साहिलबुवा शेख, ह.भ.प. योगेश शिंदे, ह.भ.प. कार्तिक भंडारे, अजित शिंदे यांनी सहभाग घेतला आहे. सोमवारी सायंकाळी मनमाडकरांच्या मठात सायंकाळी दाखल झाली. यावेळी महाराजांच्या पादुकांची प्रतिष्ठाणा, हरीपाठ, जागर, व आषाढीच्या दिवशी सकाळी अभिषेक, मठातील विठ्ठल-रूखमीनीच्या मुर्तीचे पुजन, यानंतर ह.भ.प. संदिप महिंद गुरूजी यांचे प्रवचन पार पडले.
तसेच ज्ञानेश्वरी आणि पारयणाचे उद्यापन होऊन गोडाचा नैवद्य होऊन, एकनाथी भागवतीचे पारायण गुरूपौर्णिमेपर्यंत पंढरपुरात करण्यात येणार आहे. कोपाळ काला झाल्यावर ही पालखी पावन खिंडीच्या मोहीमे अंतर्गत पुन्हा रायगडकडे मार्गस्थ होणार आहे. यावर्षी ही पालखी पन्हाळय़ाला जाऊन जाताना कुरूंदवाडला संताजी घोरपडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन, कापशीला म्हाळोजी घोरपडे व नेसरीत प्रतापराव गुजर यांच्या समाधीचे दर्शन घेऊन मेघापुरला शिवाकाशीद समाधीचे दर्शन घेणार आहे. तसेच पन्हाळगड ते विशालगड मार्गे 500 किलो मिटरचे अंतर पायी चालतच आषाढवद्य प्रतिपदेला बाजी प्रभुचें दर्शन घेऊन ही पालखा पुन्हा राजधानी रायगडी येऊन वारी पूर्ण केली की पुढील वर्षभराच्या निवासासाठी या पादुका परत शिवजन्मभूमी शिवनेरीवर येथे पोहचणार आहे.