
स्थैर्य, सातारा, दि. २५ : गणपतीच्या बहिणी समजल्या जाणाऱ्या ज्येष्ठा व कनिष्ठा गौरींचे आज मंगळवारी दुपारी एक वाजून 59 मिनिटांनी नंतर घरोघरी तीन दिवसांसाठी आगमन झाले. आल्या आल्या गौरी सोन्याच्या पावलांनी, चांदी, मोत्याच्या पावलांनी.. असे म्हणत घरोघरी सुवासिनींनी या ज्येष्ठा व कनिष्ठा गौरींचे वाजत गाजत तसेच पूजन आरती करून स्वागत केले.
उद्या बुधवारी या गौरींचा मुख्य पूजन सोहळा असून गुरुवारी सायंकाळनंतर या गौरींचे विसर्जन केले जाते . दरवर्षी गणेश चतुर्थी नंतर दोन-तीन दिवसांनी येणार्या भाद्रपद शुद्ध सप्तमी च्या अनुराधा नक्षत्रावर या जेष्ठा व कनिष्ठा गौरींचे माहेरवाशिणी म्हणून आगमन होते. त्यानंतर आज शेपू भाजी, खीर पोळीचा नैवेद्य दाखवून उद्या महापूजा व पुरणपोळीचा नैवेद्य असतो ..परवा दिवशी विसर्जनाच्यावेळी दही भात दाखवून घरगुती गणपतींचे विसर्जन होते. या वर्षी कोरोना या संकटामुळे गणेशोत्सवातील या गौरींच्या आगमनामुळे घरोघरी विशेष चैतन्य व उत्साह दिसून आला पावसानेही उघडीप दिल्यामुळे महिलांमध्ये विशेष उत्साह दिसून येत होता.