हजारोंच्या उपस्थितीत बगाड यात्रा बावधन गावात अटकसत्र सुरू : शंभरावर ग्रामस्थांना अटक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, वाई, दि.०३: बावधन, ता. वाई येथे बगाड यात्रा हजारो भविकांची उपस्थिती पार पडली. प्रशासनाने करोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर यात्रेला बंदी घातलेली असतानाही प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करत हजारो भाविकांच्या उपस्थितीत यात्रा पार पडल्याबद्दल शंभरावर ग्रामस्थांना पोलिसांनी अटक केली आहे. गावात अजूनही अटक सत्र सुरूच आहे.

बावधनमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व यात्रेच्या निमित्ताने गावामध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने संपूर्ण गावाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केला आहे. तरी देखील भैरवनाथाच्या यात्रेचे बगाड शुक्रवारी मोठ्या उत्साहात पार पडले. बगाड मिरवणुकीत हजारो ग्रामस्थांनी उपस्थिती लावली होती.

बावधन (ता. वाई) येथील भैरवनाथाची बगाड यात्रा दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी होते. यावेळी गावामध्ये करोना बाधितांची संख्या वाढत असल्याने व यात्रेच्या अनुषंगाने गर्दी वाढू नये, म्हणून गाव संपूर्ण गाव परिसर प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केलेला होता. मागील आठ दिवसापासून गावातील सर्व व्यवहार बंद होते. बगाड यात्रा होऊ नये, यासाठी प्रांताधिकारी संगीता चौगुले राजापूरकर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शितल जानवे खराडे, तहसीलदार रणजीत भोसले, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर आदींनी गावामध्ये अनेक बैठका घेऊन ग्रामस्थांनी करोना काळामध्ये यात्रेला घातलेल्या बंदीबाबत जनजागृती करत बगाड मिरवणूक करू नये, असे आवाहन केले होते. संपूर्ण राज्यात बावधनची भैरवनाथ बगाड मोठी व एकमेव यात्रा म्हणून ओळखली जाते. मात्र आज पहाटे अचानक ग्रामस्थांनी बगाड रथ बांधून कृष्णा तीरावरून आणून तेथून वाजत गाजत गावात आणला. होळी पौर्णिमेच्या रात्री भैरवनाथ मंदिरात बगाड्या कौल लावून ठरवला जातो. दगडी चाके असलेला व संपूर्ण लाकडमध्ये बांधलेल्या बगाड रथाला बैलांच्या साह्याने ओढले जाते. एका वेळी किमान बारा ते सोळा बैल जोडून हा गाडा ओढला जातो. बगाड यात्रेसाठी दरवर्षी मोठी गर्दी होते. आज बगाड यात्रेला ग्रामस्थांनी मोठी गर्दी करत बगाडाचा रथ गावात बैलांच्या साहाय्याने गावात आणला. प्रशासनाने पहाटेच्या सुमाराला कृष्णा तीरावरील सोनेश्‍वर येथे ग्रामस्थांना बगाड मिरवणूक काढू नये, अशी विनंती पुन्हा एकदा केली. मात्र, या बंदीला झुगारत ग्रामस्थांनी मिरवणूक बगाड मिरवणूक काढली. या मिरवणुकीसाठी बाहेरील भाविकांची गर्दी टळली असली तरी गावातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ एकत्र आल्याने किमान दहा हजार भाविक या यात्रेत सहभागी झाल्याचे दिसून आले. मागील वर्षी करोना संसर्गामुळे यात्रेवर बंदी घातली होती. तरीही यात्रा केल्याने यात्रा कमितीवर गुन्हा दाखल केला होता.
सकाळपासून अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील परिस्थितीचा आढावा घेत यात्रेमध्ये होते. त्यांनी स्वतः बावधनमध्ये येऊन परिस्थितीची व यात्रेची पाहणी केली. प्रशासनाचा व ग्रामस्थांचा संघर्ष टाळण्यासाठी बगाड रथ प्रशासनाने गावात येऊ दिला. यानंतर पोलिसांनी गावात नियम भंग केल्याप्रकरणी धरपकडीचे सत्र सुरू केले असून आतापर्यंतचे शंभरावर लोकांना अटक केली आहे. तर अनेकांवर गुन्हा दाखल केला आहे.बगाड रथ मंदिराजवळच पोहोचताच काही वेळात गावात सामसूम झाली.

मागील आठ दिवसांपासून गावामध्ये येऊन गर्दी टाळण्यासाठी तालुका प्रशासन बगाड मिरवणूक करू नये म्हणून ग्रामस्थांना आवाहन करत होते. गावामध्ये प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले होते. मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे अभिवचनही दिले होते. तरीसुद्धा ग्रामस्थांनी नियमभंग करत बगाड यात्रा पार पाडली. त्यामुळे संबंधितांवर आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करणार आहे.
– संगीता राजापूरकर चौगुले, प्रांताधिकारी

प्रशासनाचा आदेशाचे उल्लंघन व नियमाचे उल्लंघन करणार्‍या सर्वांवर गुन्हा दाखल करणार आहे.
– धीरज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक, सातारा


Back to top button
Don`t copy text!