स्थैर्य, सातारा, दि. 20 : सातारा जिल्ह्यासह पुणे व सोलापूर जिल्ह्यात जबरी चोर्या, घरफोड्या करणार्या टोळीतील एक सराईत चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोळकी, ता. फलटण येथे जेरबंद केले. या चोरट्याने अनेक गुन्ह्यांची कबुली पोलिसांकडे दिली आहे.
याबाबत माहिती अशी, दि. 19 रोजी सर्जेराव पाटील पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना गोपनिय बातमी प्राप्त झाली की, दि. 19 रोजी घरफोड्या करणारा एक संशयीत कोळकी फलटण परिसरात वावरत असल्याची खबर एलसीबीला मिळाली. त्यानुसार एलसीबीचे पो.नि. सर्जेराव पाटील यांनी त्यास ताब्यात घेण्याचे आदेश पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जहाड व पथकास दिले. त्याप्रमाणे तपास पथकाने फलटण शहर व परिसरामध्ये सापळा लावून संशयीतास ताब्यात घेतले. यानंतर संशयीताची कसून चौकशी केली असता त्याने व तयाच्या साथीदारांनी फलटण ग्रामीण, फलटण शहर, पुणे जिल्ह्यातील वडगाव निंबाळकर, भिगवण परिसरामध्ये 6 घरफोडी चोरी, 1 जबरी चोरी, 1 मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे. तसेच पुणे ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जेजूरी तसेच सोलापूर जिल्ह्यातील फलटण-माळशिरस रस्त्यावरील दुकानाचे शटर उचकटून दुकानातील सोन्याचे दागिले चोरल्याची कबुली दिली. त्याचप्रमाणे वेळापूर, माळशिरस परिसरातदेखील घरफोडी व चोर्या केल्याचे संशयीताने सांगितले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सूचनेप्रमाणे पोनि सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जर्हाड, स. फौ. उत्तम दबडे, पो. हवा. तानाजी माने, मुबीन मुलाणी, विजय कांबळे, पो.ना. शरद बेबले, नितीन गोगावले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, रवींद्र वाघमारे, मुनीर मुल्ला, अर्जुन शिरतोडे, विक्रम पिसाळ, चा. पो. ना. संजय जाधव, विजय सावंत यांनी केली.