दैनिक स्थैर्य । दि.०५ जानेवारी २०२२ । कराड । कराड तालुक्यातील कार्वे-कोरेगाव रस्त्यालगत असलेल्या भैरोबा मंदिरानजीक असलेल्या शेतात युवतीचा खून करून मृतदेह टाकून देण्यात आला होता. तसेच पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्नही मारेकर्याने केला होता. अत्यंत किचकट अशा या खूनप्रकरणाचा पोलिसांनी चार तासात छडा लावत संशयितास अटक केली. कराड तालुका पोलिसांसह सातारा एलसीबी यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. संशयितास न्यायालयासमोर हजर केले असता 10 जानेवारीपर्यंत सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
वनिता आत्माराम साळुंखे (वय 30, रा. महिंद, ता. पाटण) असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे तर शरद हणमंत ताटे (वय 30, रा. येरवळे, ता. कराड) असे संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कार्वे-कोरेगाव रस्त्यालगत भैरोबा मंदिरा शेजारून कृष्णा नदीकडे जाणार्या रोडवर उसाच्या शेतात अनोळखी सुमारे तीस वर्षे वयाच्या युवतीचा मृतदेह आढळून आला होता. याची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक डॉ. रणजीत पाटील, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक भैरव कांबळे, भरत पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच खुनाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल व अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना तपासाच्या अनुषंगाने सूचना केल्या. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ हे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस कर्मचार्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करत असताना मृतदेहाजवळ चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. चिठ्ठीमध्ये एका व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करून त्याने मला लग्न करतो म्हणून आणले. माझ्याशी संबंध ठेवले व माझ्याबरोबर लग्न करत नसून मला मारहाण करून माझ्याशी संबंध ठेवले आहेत. मी जीव दिला किंवा मला काय झाले तर त्यास तो जबाबदार आहे, असा मजकूर लिहिला होता. तसेच चिठ्ठी सोबत संबंधित व्यक्तीच्या आधार कार्डची झेरॉक्स ठेवली होती. त्या चिठ्ठीच्या आधारे व आधार कार्ड वरील नावावरून पोलिसांनी तपास सुरू केला. त्यावेळी त्यांना चिठ्ठीजवळ थोडा गांजा मिळून आला. तसेच ज्या व्यक्तीच्या नावाचे आधार कार्ड होते. त्याच्या घरातही गांजा सापडला. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. पोलिसांनी माहिती घेत असताना घरात गांजा कोणी ठेवला याबाबत माहिती घेतली असता संशयिताचे नाव समोर आले. त्यामुळे पोलिसांनी संशयित शरद हनमंत ताटे याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
संशयित शरद ताटे याची मयत वनिता साळुंखे हिच्याशी तोंडओळख होती. त्यांचे यापूर्वी अनेक वेळेला बोलणेही झाले होते. रविवारी त्यांच्यात पुन्हा संवाद झाल्यानंतर शरद ताटे याने वनिता साळुंखे हिला रात्री 8 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून कार्वे-कोरेगाव येथे नेले. रात्री आठ साडेआठ वाजण्याच्या सुमारास घटना घडलेल्या ठिकाणी दोघेजण थांबले असतानाच शरद ताटे यांने वनिताचा गळा दाबून खून केला. त्यानंतरही त्याने तिच्या डोक्यात दगड घातला. त्यामुळे तिच्या डोक्याला व शरीरावर जखमा झाल्याचे व मृतदेहाजवळ दारूची बाटली सापडले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी या घटनेत संशयिताने वापरलेली दुचाकी जप्त केली आहे.
अतिशय किचकट व खून करून त्याचा बनाव करत दुसर्याला अडकवण्याचा प्रयत्न करणार्या संशयिताला पोलिसांनी अतिशय नियोजनबद्ध व व कौशल्यपूर्ण तपास करत केवळ चार तासातच अटक केली. ज्या युवतीचा खून झाला त्या युवतीचे नाव निष्पन्न होण्यापूर्वीच पोलिसांनी खून करणार्या संशयितांला अटक केल्याने त्यांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनांनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक भैरव कांबळे, भरत पाटील, गणेश वाघ यांच्यासह शरद बेबले, साबिर मुल्ला, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, रोहित निकम, विशाल पवार, मयूर देशमुख, मोहसीन मोमीन, धनंजय कोळी, सज्जन जगताप, उत्तम कोळी, नंदकुमार भोसले, प्रशांत एक्के, सुनंदा कांबळे, मनीषा खराडे, निलेश कदम, मिलिंद बैले, संजय काटे, अमोल पवार यांच्यासह कराड तालुका पोलीस व सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.