शाहूपुरी पोलिसांची कारवाई; ट्रॅक्टर-ट्रॉलीसह 7 लाख 4 हजारांचा मुद्देमाल हस्तगत
स्थैर्य, सातारा, दि. 17 : सातारा शहर व परिसरात अवैधरीत्या वाळूची चोरटी वाहतूक करणार्या ट्रॅक्टर चालकाला शाहूपुरी पोलिसांनी अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याच्याकडून तब्बल 7 लाख 4 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी (दि. 16) एक इसम रानमळा करंजे सातारा येथील वेण्णा नदीच्या पात्रातील वाळूची चोरी करून अवैधरीत्या ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून वाहतूक करणार आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी कारवाई कामी पोलिसांचे पथक तयार केले. सपोनि विशाल वायकर यांनी कारवाई पथकाच्यासह मिळालेल्या माहितीप्रमाणे करंजे नाका येथे सापळा लावला. दरम्यान, 21.10 वा.च्या सुमारास त्याठिकाणी एक ट्रॅक्टर-ट्रॉलीमधून एक इसम वाळूची वाहतूक करीत असताना दिसून आला. त्या पथकाने वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर-ट्रॉली थांबवून माहिती घेतली असता सदरचा ट्रॅक्टर चालक हा त्याच्या ताब्यातील ट्रक्टरच्या साह्याने वेण्णा नदीच्या पात्रामधून वाळू चोरी करून वाळूची चोरटी वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले. संबंधित पथकाने त्या इसमास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर-ट्रॉली व त्यामधील सुमारे 1 ब्रास वाळू असा एकूण 7 लाख 4 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. संबंधित ट्रॅक्टर चालकाविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल हिम्मत दबडे-पाटील, पो. कॉ. पंकज मोहिते यांनी केली.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक किरण यादव हे करीत आहेत.