खंडाळा पोलिसांची कारवाई; 65 हजारांचा मुद्देमाल हस्तगत
स्थैर्य, खंडाळा, दि. 25 : खंडाळा येथे अवैध गुटखा, पान, तंबाखू विक्री करणार्या अड्ड्यावर खंडाळा पोलिसांनी छापा टाकत कारवाई करून सुमारे 65 हजार 840 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी नितीन मारुती गाढवे (रा. शिक्षक कॉलनी, ता. खंडाळा) यास अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिक्षक कॉलनी येथील रहिवासी नितीन मारुती गाढवे (रा. खंडाळा) याने अवैध गुटखा व पान मसाला, तंबाखू याचा घरात बेकायदेशीर साठा करून ठेवल्याची गोपनीय माहिती खंडाळ्याचे सपोनि हनुमंत गायकवाड यांना मिळाली. त्याप्रमाणे त्यांनी मिळालेल्या माहितीची खातरजमा करून खंडाळा पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती पवार यांच्या अधिपत्याखाली एक पथक तयार करून दोन पंचासमक्ष नितीन मारुती गाढवे याच्या शिक्षक कॉलनी (ता. खंडाळा) येथील राहत्या घरी दोन पंचासमक्ष छापा टाकण्याबाबतचे आदेश देऊन पुढील कारवाई करण्याबाबत कळविले. त्याप्रमाणे संबंधित पथकाने नितीन गाढवे याच्या राहत्या घरी दोन पंचासमक्ष छापा टाकला असता घरामध्ये पान मसाला, तंबाखूचा बेकायदेशीर साठा केलेले अंदाजे 10 बॉक्समधील एकूण 51 हजार 450 रुपये किमतीचा गुटखा, पान मसाला आणि तंबाखू तसेच 14 हजार 390 रुपये रोख रक्कम असा एकूण 65 हजार 840 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला. त्यावरून नितीन मारुती गाढवे (रा. शिक्षक कॉलनी, खंडाळा) याच्यावर खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास हनुमंत गायकवाड करीत आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण तानाजी बरडे यांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाखाली खंडाळा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती पवार, अन्न सुरक्षा अधिकारी राहुल खंडागळे, अमोल पवार, पो. हवा. संजय धुमाळ, पो.ना. सुरेश मोरे, सचिन वीर, तुषार कुंभार, बालाजी वडगाये, दिग्विजय पोळ यांच्या पथकाने केली.