स्थैर्य, पुणे, दि. 01 : दरोड्याच्या तयारीत असताना सिंहगड रस्ता येथे पकडलेल्या टोळीकडून गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने बिबवेवाडी येथील दरोड्याचा एक गुन्हा उघडकीस आणला आहे. या आरोपींनी एका देशी दारुच्या दुकान मालकास शस्त्राचा धाक दाखवून लूटले होते. त्याच्याकडील रोख 50 हजार आणी 20 हजाराचा मोबाईल चोरण्यात आला होता. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात 24 मे रोजी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
विकास गंगाराम राठोड(धायरी), प्रथमेश महादू येनपुरे(दत्तनगर), अनिकेत शिवाजी घायतडक( हडपसर), आकाश अरुण पवार( कात्रज), जिनाब हबीब अंन्सारी (पनवेल), योगेश रमेश जनघने( बिबवेवाडी) अशी आरोपींची नावे आहेत.
गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सिंहगड रस्त्यावर एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला 28 मे रोजी पकडले होते. त्यांच्या पोलिस कोठडी दरम्यान कसून तपास केला असता, त्यांनी बिबवेवाडी येथील दरोड्याच्या गुन्हयाची कबुली दिली. एका देशी दारूचे दुकानमालक कर्मचाऱ्यासह दुचाकीवरुन रोकड घेऊन चालले होते. यावेळी त्यांना आरोपींनी अप्पर डेपो येथे दुचाकी आडवी घालत अडवले. यानंतर कोयत्याचा धाक दाखवत रोख व मोबाईल असा 70 हजाराचा ऐवज चोरुन नेला.
चोरलेला ऍपल कंपनीचा मोबाईल आंबेगाव येथील एका विहिरीत टाकला होता. तो फोन, गुन्हयातील 37 हजार 500 रुपये, गुन्हयासाठी वापरलेली दुचाकी ,कोयता आणी रॅम्बो सुरा असा 2 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. गुन्हयात वापरलेली दुचाकी वाकड येथून चोरलेली असून वाकड पोलिस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल आहे. ही कारवाई अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंग, सहायक पोलिस आयुक्त डॉ.शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र ढवळे, पोलिस उपनिरीक्षक किरण अडागळे यांच्या पथकाने केली.