४८ कोटींची खोटी बिले देणाऱ्यास अटक; महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाची कारवाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑगस्ट २०२२ । मुंबई । महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाने केलेल्या कारवाईत जी.एस.टी. ची 48 कोटी रुपयांची खोटी बिले देणाऱ्यास अटक करण्यात आली आहे.

जी. एस.टी. ची खोटी बिले देत असल्याचा संशय असलेल्या मे. विवांता मेट्ल कॉर्पोरेशन या व्यापाऱ्यांसंबंधी राज्य वस्तू व सेवा कर विभागाने विशेष तपास हाती घेतला होता. मे. विवांता मेट्ल कॉर्पोरेशनचा मालक इम्तियाझ अब्दुल रेहमान सय्यद, (वय -35 रा. चिता कॅम्प, मानखुर्द, मुंबई) याने कुठल्याही वस्तू किंवा सेवेची खरेदी-विक्री न करता सुमारे 48 कोटी किमतीच्या खोट्या बिलांवर आधारीत, सुमारे 8.70 कोटी रुपयाचे- Input Tax Credit (ITC) म्हणजेच, त्याला देय असलेल्या जी.एस.टी रकमेवर, 8.70 कोटी रुपयांची खोटी वजावट घेतली आणि याच स्वरुपाची खोटी बिले इतर कंपन्यांना जारी केली. ही रक्कम देखील सुमारे 9 कोटीच्या घरात आहे.

अस्तित्वात नसलेल्या अशा बोगस कंपन्यांकडून बिले घेऊन कर भरणे टाळणे, हा वस्तू व सेवाकर कायद्यांतर्गत गुन्हा आहे. या पार्श्वभूमीवर दि. 05 ऑगस्ट 2022 रोजी, वस्तू व सेवा कर विभागाने, इम्तियाझ अब्दुल रेहमान सय्यद यास अटक करून न्यायालयात हजर केले. मुंबईचे अतिरिक्त महानगर दंडाधिकारी यांनी त्यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर विभागाच्या अन्वेषण-ब शाखेच्या प्रमुख व सहआयुक्त, श्रीमती. सी. वान्मथी (भा.प्र.से), यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्यकर उपायुक्त श्रीमती. रुपाली बारकुंड यांच्या पर्यवेक्षणात ही मोहीम पार पडली. याप्रकरणी सहायक राज्यकर आयुक्त श्री. दिपक दांगट, पुढील तपास करत आहेत. सहायक राज्यकर आयुक्त – ऋषिकेश वाघ, रामचंद्र मेश्राम, सुजीत पाटील आणि अन्वेषण-ब विभागातील राज्यकर निरीक्षकांनी या विशेष मोहीमेत सक्रिय सहभाग घेतला. वर्ष 2022-23 मधील या 33 व्या अटकेद्वारे महाराष्ट्र राज्य वस्तू व सेवा कर विभागाने, खोटी बिले आणि खोट्या कर वजावटी घेणाऱ्या कसुरदार व्यापाऱ्यांना कडक इशारा दिला आहे.


Back to top button
Don`t copy text!