दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑगस्ट २०२२ । मुंबई । मुंबईबाबत वादग्रस्त विधान केल्यानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नुकतेच टीकेचे धनी झाले होते. यानंतर सोशल मीडियातूनही नेटकऱ्यांनी त्यांना निशाणा बनवलं होतं. अशाच एका नेटकऱ्यानं अर्थात प्रदीप भालेकर नामक व्यक्तीनं राज्यपालावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. याची शहानिशा केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या क्राईम इन्व्हेस्टिगेशन युनिटकडून या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या क्राईम इन्व्हेस्टिगेशन युनिटनं कुरार भागातील प्रदीप भालेकर नामक व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर ट्विटरवरील पोस्टद्वारे शिवीगाळ केली होती.
गुजराती, राजस्थानी लोकांना जर मुंबईतून बाहेर काढलं तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोश्यारी हे तमाम मराठी जनांच्या टीकेचे धनी झाले होते. याची तीव्र राजकीय पडसादही उमटले होते.
खुद्द भाजपनंही राज्यापालाचं हे वैयक्तिक मत असल्याचं सांगत भाजप त्यांच्या विधानाचा निषेध करतो असंही म्हटलं होतं. हे प्रकरण वाढत असल्याचं लक्षात येताच राज्यपालांनी जाहीररित्या आपल्या विधानाबाबत दिलगिरी व्यक्त करत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.