दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑक्टोबर २०२१ । खंडाळा । खंडाळा तालुक्यातील शिरवळ गावच्या हद्दीमध्ये एसटी स्टॅन्डलगत एका पानटपरीवर प्रतिबंधित गुटख्याची,पानमसाला विक्री व साठा केल्याप्रकरणी एका टपरीचालकाला शिरवळ पोलीसांनी व अन्न व भेसळ विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करीत जेरबंद केले आहे. यामध्ये गणेश ज्ञानोबा शेडगे (वय ४७,रा.शिरवळ ता. खंडाळा) असे अटक करण्यात आलेल्या टपरीचालकाचे नाव आहे. संबंधितांकडून साधारणपणे १५.७१३ किलो असा अंदाजे १९ हजार २२२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित टपरी अन्न व भेसळ विभागाच्या अधिकाऱ्यांनी सीलबंद केली आहे.
याबाबतची शिरवळ पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, शिरवळ ता.खंडाळा येथील एसटी स्टॅन्डलगत असणा-या एका टपरीवर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला पानमसाला व इतर अन्न पदार्थ विक्री व साठा केल्याची माहिती शिरवळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ ,पोलीस अंमलदार जितेंद्र शिंदे,अमोल जगदाळे, स्वप्नील दौंड यांच्या पथकाने सातारा येथील अन्न व भेसळ प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी रोहन शहा, आय.एस.हवालदार यांना याबाबतची कल्पना देत संबंधित ठिकाणी छापा टाकला असता त्याठिकाणी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला हिरा पानमसाला ५८ पॅकेट १० हजार २०८ रुपये, रॉयल ७१७ तंबाखू ४९ पॅकेट २ हजार १५६ रुपये, विमल पानमसाला २५ पॅकेट ४ हजार ९५० रुपये, व्ही-वन सुगंधी तंबाखू ४५ पॅकेट ९९० रुपये, आरएमडी पानमसाला ५४ पॅकपुड्या ६४८ रुपये, एम. सुगंधी तंबाखू ५४ पॅकपुड्या असा एकूण १५.७१३ किलो वजन असा १९ हजार २२२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शिरवळ पोलीसांनी गणेश शेडगे याला अटक करीत खंडाळा येथील न्यायालयासमोर उभे केले असता खंडाळा न्यायालयाने सोमवार दि.११ ऑक्टोबरपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे शिरवळ परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, गणेश शेडगे याच्या मालकीची पानटपरी अन्न व भेसळ विभागाने सीलबंद केली आहे. या घटनेची फिर्याद अन्न व भेसळ प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी रोहन शहा यांनी शिरवळ पोलीस स्टेशनला दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद दिक्षित हे करत आहे.