
दैनिक स्थैर्य । दि. ३० जुलै २०२२ । फलटण । मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे कनिष्ठ विभागात शिकत असणाऱ्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांच्या पावसाळी आंतरकुल क्रीडा स्पर्धा – 2022 चे उदघाटन मा. श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर , सदस्य गव्हर्निंग कौन्सिल , फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण, व सदस्य, महाविद्यालय विकास समिती यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 29/ 7/ 2022 रोजी झाले. याप्रसंगी मा. श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना व खेळाडूंना मार्गदर्शन करताना विद्यार्थी जीवनातील खेळाचे महत्व सांगितले. ते म्हणाले की, अभ्यास करीत असताना विद्यार्थ्यांच्या मनावर अनेक प्रकारचे ताण तणाव येत असतात. ते ताण तणाव दूर करण्यासाठी व भविष्यातील उज्वल यश संपादन करण्यासाठी तसेच उत्तम आरोग्य मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी खेळाकडे वळावे. विद्यार्थी दशेत कोणता ना कोणता एक खेळ हा विद्यार्थ्यांनी खेळायलाच हवा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पी. एच. कदम म्हणाले की खेळामुळे यश-अपयश पचविण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये व खेळाडूंमध्ये निर्माण होते. तसेच विविध गुणांचा विकास होतो. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी शतप्रतिशत मैदानाचा वापर करावा. खेळांमुळे जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन हा निश्चितच सकारात्मक बनतो. असेही त्यांनी यावेळी नमूद केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. शिवाजीराव घोरपडे, अध्यक्ष, क्रीडा समिती, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण आपल्या अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की, जिद्द व चिकाटी या गुणांमुळेच खेळाडू नक्कीच यशस्वी होतात. त्यासाठी खेळाडूंनी हे गुण वाढवण्यावर भर द्यावा. सध्या विद्यार्थी करिअर म्हणून खेळाकडे पाहत आहेत. तसेच खेळातील सहभागाला मार्क्स मिळत असल्यामुळे विद्यार्थी खेळाकडे आकृष्ट होत असल्याने त्यांनी त्याबद्दल समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. एस.आर.वेदपाठक यांनी फलटण एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी हे स्वतः उत्कृष्ट खेळाडू व क्रीडाप्रेमी असल्यामुळे या स्पर्धा भरविताना पंखामध्ये बळ आल्याचा आवर्जून उल्लेख केला. या कार्यक्रम प्रसंगी मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचा, पंचांचा तसेच मान्यवरांचा रोपे देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचा कनिष्ठ विभागाचा सर्व स्टाफ, शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र-संचालन प्रा. सौ.निलम देशमुख यांनी केले. प्रा. दिलीप शिंदे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. कनिष्ठ विभाग जिमखाना प्रमुख प्रा. टी. एम. शेंडगे यांनी स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केले.