दैनिक स्थैर्य | दि. ३० मे २०२३ | सातारा |
कोरेगाव येथील खाजगी रुग्णालय व्यवस्थापक शशिकांत बोतालजी यांच्या आत्महत्या प्रकरणी दोषी असलेल्या दोघा डॉक्टरांसह एका व्यावसायिकास अटक न झाल्यास जिल्ह्यातील दलित समाजबांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढतील, असा इशारा सोमवारी देण्यात आला.
कांतीलाल कांबळे, किशोर साठे, मारुती बोभाटे, श्रीकांत कांबळे, प्रदीप बोतालजी, नितीन बोतालजी, सिताराम भवाळ, लक्ष्मण बोतालजी, पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र बोतालजी, चंद्रकांत बोतालजी, दादासाहेब माने, बाबुराव गायकवाड, पूजा बनसोडे आदींसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
बोतालजी आत्महत्या प्रकरणामध्ये दोषी असणार्यांचे पासपोर्ट तातडीने जप्त करावेत, त्यांची बँक खाती बंद करावीत, गेल्या आठ वर्षातील आर्थिक व्यवहारांची तपासणी करावी, बोतालजी कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्यावे व आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांचे पुनर्वसन करावे, आदी मागण्या या निवेदनामध्ये करण्यात आल्या आहेत.