दैनिक स्थैर्य । दि. २४ फेब्रुवारी २०२२ । मुंबई । पुण्यातील तरुणीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी शिवसेना उपनेते आणि राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेल्या किमान वेतन सल्लागार समितीचे अध्यक्ष रघुनाथ कुचीक यांना तातडीने अटक करावी, या तरुणीला सहा महिन्यांच्या आता न्याय देण्यासाठी विशेष न्यायालयाच्या धर्तीवर यंत्रणा कार्यान्वीत करा , अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी गुरुवारी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुचिक यांची किमान वेतन सल्लागार समितीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी , अशी मागणीही त्यांनी केली.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेत पीडित तरुणीही उपस्थित होती. यावेळी या तरुणीने कुचीक यांच्याकडून, राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे यांचे पती बाळासाहेब तसेच यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये दत्ता बाळसराफ यांच्याकडून झालेल्या अत्याचारांची कहाणी सांगितली.
श्रीमती चित्रा वाघ यांनी सांगितले की, कुचिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊन आठ दिवस उलटले तरी त्यांना अद्याप अटक झालेली नाही. राज्याच्या गृहमंत्र्यांनी ७ दिवसांत या तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी या गुन्ह्याच्या तपास कार्याचा आढावा घ्यावा , तसेच जळगाव सेक्स स्कँडल प्रकरणी जसे विशेष न्यायालय नेमले गेले त्याच पद्धतीने या तरुणीला न्याय देण्यासाठी यंत्रणा कार्यान्वीत करावी तसेच या गुन्ह्याच्या तपासात कुचराई केलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध अशी भाजपाची मागणी आहे. ही पोलिसांची अनास्था की बलात्काऱ्यांना सहकार्य याचे उत्तर पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी द्यावे असेही त्या म्हणाल्या.
१६ फेब्रुवारी रोजी कुचिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला, २१ फेब्रुवारीला त्यांना जामीनही मिळाला. दरम्यानच्या काळात स्पॉट पंचनामे झाले होते. हे पुरावे पोलिसांकडे जमा असताना पुणे पोलिसांनी कुचिक यांना जामीन मिळू नयेत यासाठी का प्रयत्न केले नाहीत असा सवाल त्यांनी केला.
सत्ताधारी आघाडीतील नेत्यांना सत्तेचा माज आला असून सत्तेच्या जोरावर आपल्याविरुद्ध बोलणाऱ्यांचे आवाज दाबण्याचे प्रकार सत्ताधाऱ्यांकडून सुरु आहेत. संभाजीनगर जिल्ह्यात महिलेला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना आमदाराविरुद्ध जामीनपात्र किरकोळ गुन्हे दाखल केले गेले. मात्र त्या महिलेविरुद्ध तातडीने अॅट्रॉसिटी चाही गुन्हा दाखल केला गेला. पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या मुलाविरुद्ध भाजी विक्रेत्या महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला. मात्र दुसऱ्याच दिवशी या महिलेविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला गेला. सत्ताधारी मंडळींविरुद्ध आवाज उठविणाऱ्याविरुद्ध त्वरेने गुन्हा दाखल करण्याची प्रथा महाविकास आघाडी सरकारने रुढ केली असल्याचेही त्यांनी नमूद केले. या तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी वचनबद्ध आहे , असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
पत्रकार परिषदेला उपस्थित असणाऱ्या तरुणीने कुचिक यांचा आपला परिचय कसा झाला, कुचिक यांनी आपल्याशी जवळीक निर्माण करत शारीरिक संबंध कसे प्रस्थापित केले, गर्भवती झाल्यावर आपल्या गर्भपाताचे कसे प्रयत्न झाले याचा तारीखवार वृत्तां सादर केला. त्याआधी राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे यांचे पती बाळासाहेब नागवडे, दत्ता बाळसराफ यांनी आपल्यावर गुंगीचे औषध पाजून अत्याचार केले, याची क्लिप बनवून त्या आधारे ब्लॅकमेल करत नागवडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या अत्याचाराची माहितीही या तरुणीने दिली. या अत्याचाराचे सर्व पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले असून बाळासाहेब नागवडे व बाळसराफ हे जामीनावर आहेत, अशी माहितीही या तरुणीने दिली.