दैनिक स्थैर्य । दि.११ जानेवारी २०२२ । सातारा । नगरपालिकेला चुना लावणाऱ्यासह तब्बल दहा हजार थकबाकीदारांना वसूली व कारवाईची नोटीस पाठविण्याच्या हालचाली वसूली विभागात सुरू झाल्या आहेत. येत्या काही दिवसांतच या नोटीसा धाडल्या जाणार असून, कारवाई टाळण्यासाठी थकबाकी जमा करावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
मालमत्ता व पाणीकरापोटी सातारा पालिकेला तब्बल ४४ कोटी कोटींचे उद्दीष्ट गाठावयाचे आहे. यापैकी आजअखेर सुमारे ११ कोटींचा महसूल पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. नवीन आर्थिक वर्ष संपण्यासाठी आणखी अडीच महिन्यांचा कालावधी आहे. या कालावधीत पालिकेपुढे ३३ कोटींच्या थकबाकी वसुलीचे मोठे आव्हान आहे. सद्यस्थितीत शहरात असे अनेक मिळकतदार असे आहेत की ज्यांची थकबाकी लाखांच्या घरात आहे. अनेकांनी गेल्या तीन-चार वर्षांत कर भरणाच केलेला नाही. अशा बड्या धेंड्यांना काही राजकीय मंडळींचा देखील अभय मिळत आहे. त्यामुळे पालिकेच्या वसूली विभागाची दोन्ही बाजूने कोंडी झाली आहे.
ही कोंडी फोडून थकबाकीचे उद्दीष्ट गाठण्यासाठी वसूली विभागाने कंबर कसली आहे. शहरातील जवळपास दहा हजार मिळकतदारांना नोटीस बजावण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या काही दिवसांत या नोटीस संबंधितांच्या हातात पडतील. याकामी पालिकेने भाग निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली पथकांची नेमणूही केली आहे.
नागरिकांनी थकबाकी वेळेत जमा करून पालिकेला सहकार्य करावे, प्रशासनावर कारवाईची वेळ कोणीही आणू नये असा इशारा अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले यांनी दिला आहे.
बड्या धेंड्यांवर कारवाई कधी?
सातारा पालिकेच्या वसूली विभागाने गत वर्षी थकबाकी वसूलीसाठी जप्ती पथकासह एकूण पाच पथके नेमली होती. याची धास्ती घेत अनेक बड्या धेंड्यांनी पालिकेत स्वत: येऊन कर भरणा केला. यंदाही लाखोंच्या घरात थकबाकी असणाºयांची संख्या मोठी आहे. अशा बड्या धेंड्यावरही प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे.