दैनिक स्थैर्य । दि.२१ मार्च २०२२ । मुंबई । सातारा जिल्ह्यातील जिहे कठापूर येथील गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजना प्रकल्पावर आतापर्यंत ६५९ कोटी रुपयांचा खर्च झाला. हा प्रकल्प जून २०२५ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, त्यासाठी ६७१.७४ कोटी रुपयांचे आर्थिक नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज विधानसभेत दिली.
विधानसभा सदस्य सर्वश्री जयकुमार गोरे, अभिमन्यू पवार, ॲड. राहुल कुल यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना जलसंपदा मंत्री श्री. पाटील म्हणाले की, जिहे कठापूर येथील गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत दुष्काळग्रस्त माण तालुक्यातील १५ हजार ८०० हेक्टर आणि खटाव तालुक्यातील ११ हजार ७०० हेक्टर असे २७५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पास १३३०.७४ कोटी रुपये किंमतीची सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेली आहे.
या प्रकल्पांतर्गत सद्यस्थितीत जिहे कठापूर बॅरेजेसचे काम पूर्ण झाले असून सप्टेंबर २०२१ मध्ये पाणीसाठा देखील करण्यात आला आहे. प्रकल्पाची मुख्य पंपगृहे, मुख्य उर्ध्वगामी नलिकेची एक रांग, वर्धनगड बोगदा, येरळा नदीवरील आणि माण नदीवरील १६ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पूर्ण झाले आहेत. प्रकल्पाची कळयंत्रे आणि विद्युत वाहिन्यांची कामे पूर्ण झाली असून ही कामे सप्टेंबर २०२१ मध्ये पूर्ण करुन योजना अंशतः कार्यन्वित करण्यात आली आहे. जिहे कठापूर बॅरेजमधून पाणी उचलून ते नेर तलावात सोडल्यामुळे खटाव तालुक्यात ७९०० हेक्टर सिंचन क्षेत्र निर्माण झाले आहे. या प्रकल्पातील नेर उपसा सिंचन योजना क्र. 1 आणि 2, मुख्य उर्ध्वगामी नलिकेची दुसरी रांगेच्या स्थापत्य, विद्युत आणि यांत्रिकी कामांची निविदा लवकरच काढण्यात येणार असल्याचेही जलसंपदा मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.