स्थैर्य, खटाव, दि. 01 : खटाव तालुक्यात मृत झालेल्या कोरोना रूग्णावर केवळ वडूज येथेच अंत्यसंस्कार न करता अंत्यसंस्कारासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषद गट अ निहाय अथवा महसूल मंडल निहाय सुविधा करावी अशी मागणी हरणाई सूतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख यांनी केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनातील अधिक माहिती अशी की, कोरोना बाधित (कोविड १९) तालुक्यातील मृतदेह वडूज येथे अंत्यविधी करणेचा निर्णय सातारा जिल्हा प्रशासनाने घेतलेला असून हा निर्णय वडूज व परिसरातील नागरिकांना धोकादायक व भीतीदायक वाटत असून येथील नागरिक मानसिक दबावाखाली आहेत. या संबंधीत विषयाच्या बराच तक्रारी येत आहेत. तरी जिल्हा कार्यालयाच्या या निर्णयाचा पुनरनिर्णय व पुनर्विचार करून वडुजमध्ये तालुक्यातील कोरोना बाधित मृतदेह (अंत्यसंस्कार) न करता दुसऱ्या ठिकाणी त्याची तात्काळ पर्याय व्यवस्था करावी तसेच प्रत्येक गट निहाय अंत्यसंस्कार केंद्र उभारावेत अशी मागणी केली आहे.
यावेळी डॉ. संतोष गोडसे, परेश जाधव, सुनील नेटके, राजेंद्र माने, धनजंय क्षिरसागर, संजय देशमुखे, बाबासाहेब फडतरे, राहुल सजगणे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.