दैनिक स्थैर्य | दि. २९ डिसेंबर २०२४ | वाई |
वाई तालुक्यातील मेणवली गावात शुक्रवारी मध्यरात्री १० ते १२ जणांच्या टोळीने सशस्त्र दरोडा टाकला. या दरोड्यात या दरोडेखोरांनी धारदार शस्त्रांचा धाक दाखवत सुमारे साडेचार लाखांचा ऐवज लुटला. यावेळी या दरोडेखोरांनी गावातील आणखीही काही घरे फोडण्याचा प्रयत्न केल्याने मेणवली परिसरात खळबळ उडाली आहे.
वाई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेणवली गावातील कोचळे यांच्या घराचा दरवाजा तोडून शुक्रवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास दहा ते बारा जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्रांसह घरात प्रवेश केला. यावेळी कोचळे यांच्या घरातील सर्वजण झोपले होते. चोरटे घरात शिरल्यानंतर सर्वजण जागे झाले. त्यावेळी चोरट्यांनी धारदार शस्त्रांचा धाक दाखवला व घरातील मौल्यवान वस्तू लुटल्या.
या घटनेची माहिती मिळताच वाई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री पोलिसांनी श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करून घटनेचा पंचनामा केला. या घटनेची वाई पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.