
स्थैर्य, मोरगिरी, दि.९: नाटोशी येथे नव्याने उपसासिंचन
योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे नाटोशी, कुसरूंड, शिंदेवाडी,
सोनवडे, सुळेवाडी, मरळी या सहा गावांतील वाढीव 377 हेक्टर क्षेत्र
सिंचनाखाली येईल. वाढीव उपसासिंचन योजनेसह संपूर्ण प्रस्ताव सुधारित
प्रशासकीय मान्यतेसाठी शासनास सादर केल्याची माहिती मोरणा-गुरेघर धरण मध्यम
प्रकल्पाचे सहायक अभियंता सागर खरात यांनी दिली.
उजव्या कालव्याचे एकूण लाभक्षेत्र 2,995 हेक्टर
आहे. धरणाच्या डावा कालवा हा धरण स्थळापासून 17 किलोमीटर लांबीचा असून हा
कालवा धावडे, कोकिसरे, मोरगिरी, किल्ले मोरगिरी, चेवलेवाडी, नेरळे, माणगाव,
आडदेव, आंब्रळे, बेलवडे खुर्द, चोपडी या 11 गावांच्या हद्दीतून जाणार आहे.
डावा कालव्याचे एकूण लाभक्षेत्र 811 हेक्टर आहे. प्रकल्पाचे एकूण
लाभक्षेत्र 3,806 हेक्टर आहे. कालव्याच्या माध्यमातून शेतीला पाणी
देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार धरणाच्या डाव्या आणि उजव्या
कालव्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
कालव्याचे पाणी झिरपून नुकसान
खोदकाम केलेल्या कालव्याशेजारील जमीन कालव्यामध्ये पाणी साचून पाण्याने
झिरपून पिकांची नासाडी होत आहे. त्याची नुकसानभरपाई आणि भूभाडेबाबत स्थानिक
शेतकऱ्यांच्या तक्रारी असल्या तरी नाटोशी येथे नव्याने उपसासिंचन योजना
प्रस्तावित केली आहे. त्यामुळे तालुक्यातील सहा गावांतील वाढीव 377
हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल.