स्थैर्य,मोरगिरी, दि २६ : सातत्याने वीजपुरवठा बंद होत असल्यामुळे कोयना आणि मोरणा नदीवर असलेल्या उपसा जलसिंचन योजना बंद पडत आहेत. त्यामुळे या योजना शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू लागल्या आहेत. त्यातच पाटबंधारे विभागाच्या अतिरिक्त करामुळे शेतकरी पुरता पिचला आहे. सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या या उपसा जलसिंचन योजनांचा मनमानी कारभार शेतकऱ्यांच्या मुळावर उठू लागला आहे.
शेतकऱ्यांच्या शिवारात पाणी खेळावे, या उद्देशाने मोरणा विभागात मोरणा आणि कोयना नदीवर सहकारी उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्याद्वारे शेतकरी आपल्या शेतात बारा महिने पिके घेताना दिसत आहेत. त्यात काही ठिकाणी लाभधारकांकडून वेळेवर पाणीपट्टी भरली जात नसल्यामुळे वीजदेयक प्रलंबित राहून उपसा सिंचन योजना बंद पडत असल्याच्या घटना घडल्या आहेत. अशातच सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने या योजना शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू लागल्या आहेत.
दरम्यान, काही खासगी व्यक्तींनी वैयक्तिक आपल्या शेतात पाइपलाइन करून पाणी आणलेले आहे. त्यामुळे या सहकारी उपसा जलसिंचन योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. लाभधारकांनी सिंचन व्यवस्थापनामध्ये सक्रिय सहभाग घेऊन पाणीपट्टी व वीज आकार नियमित भरण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण भागात असलेल्या या सिंचन योजनेची देखभाल दुरुस्ती वेळेवर होत नसल्याने शेतकऱ्यांची पिके वाळू लागली आहेत. तर मोरणा विभागात उसाचे क्षेत्र कमी होऊ लागलेले आहे. बागाईत शेतीत गुंतवणूक करून जर चार पैसे हाताला लागणार नसतील तर शेती करून काय उपयोग, अशी मानसिकता शेतकऱ्यांची झाली आहे. अशातच पाटबंधारे विभागाच्या अतिरिक्त करामुळे शेतकरी पुरता पिचला आहे.
पदाधिकाऱ्यांनी लक्ष घालणे गरजेचे
तालुक्यातील काही उपसा जलसिंचन योजना कर्जाच्या खाईत आहेत. त्या सुरू झाल्यास शेतकऱ्यांच्या शिवारात पुन्हा पाणी खेळणार आहे व त्यानुसार अधिकच क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे. कुटुंबांचा आर्थिक गाडा चालवण्याची विंवचना असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवनात आशा फुलणार आहे. याकरिता राजकीय पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे सध्या तरी गरजेचे बनले आहे.