वीज वितरणाची मनमानी, ग्रामपंचायतीना दुजवभावाची वागणूक…!

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०९ एप्रिल २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यातील पथदिवे सुरु असताना खंडाळा तालुक्यातील विविध गावांच्या हद्दीतील पथदिव्यांचा वीज पुरवठा वीज वितरण कंपनीकडून बंद करीत सापत्निक वागणूक देण्यात येत असल्याच्या निषेधार्थ खंडाळा तालुका सरपंच परिषदेच्यावतीने खंडाळा येथील विज वितरण कंपनीवर धडक मोर्चा काढण्यात आला.यावेळी पथदिवे बंद असल्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे याचा पाढाच विज वितरण कंपनीला दिलेल्या निवेदनामध्ये वाचण्यात आला.

यावेळी सरपंच परिषदेचे अध्यक्ष गणेश पवार, उपाध्यक्ष हिरालाल घाडगे, प्रदीप होळकर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या न्याय्य हक्कासाठी खंडाळा पंचायत समिती ते वीज वितरण कार्यालय असा मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील विविध गावांच्या हद्दीतील पथदिव्यांचा वीज पुरवठा बंद असल्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रात्रीच्या वेळी महिलांना बाहेर पडणे तसेच शेतकरी वर्गाला शेतावर जाण्यासाठी अंधारातून मार्ग काढावा लागत आहे. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहेत. वास्तविक सातारा जिल्ह्यातील इतर तालुक्यात सर्व गावांचा वीज पुरवठा सुरळीतपणे चालू आहे. याबाबतची माहिती प्रत्यक्ष जाऊन आम्ही घेतली आहे. मात्र, खंडाळा तालुक्यातच वीज वितरणच्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभाराचा फटका ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. तालुक्यातील काही गावांनी थकीत वीज बिले भरल्याने त्यांचा वीज पुरवठा सुरू आहे. मात्र, बहुतांश गावातील ग्रामपंचायतीचे कर उत्पन्न कमी असल्याने वीज बिले भरणे शक्य झालेले नाही, तरी इतर तालुक्यात अशा पद्धतीने वीज पुरवठा सुरू असताना खंडाळा तालुक्याला वेगळा न्याय का? असा जाब विचारण्यासाठी खंडाळा तालुक्यातील सरपंच परिषदेच्या माध्यमातून विविध गावांचे सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य यांनी लोकांच्या नागरी हक्कांसाठी वीज वितरण कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. यावेळी वीज वितरण अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सर्व गावांचा पथदिव्यांचा वीजपुरवठा तातडीने सुरू करण्याची विनंती करण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!