दैनिक स्थैर्य । दि. ३१ ऑक्टोबर २०२१ । फलटण । शेरेचीवाडी (ढवळ) ता. फलटण या गावातील विविध विकास कामांसाठी ग्रामपंचायतीमार्फत जिल्हा परिषद व पंचायत समिती यांचेकडे सातत्याने पाठपुरावा केला जात असून नुकताच शेरेचीवाडी गावातील अंतर्गत रस्त्यासाठी तीन लाख रुपये व प्राथमिक शाळा दुरुस्ती करिता दोन लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या संबंधीची प्रशासकीय मान्यता झालेली असून ही दोन्ही कामे लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच सौ. दुर्गादेवी नलवडे यांनी दिली.
शेरेचीवाडी (ढवळ) विविध विभागामार्फत प्राप्त होत असलेल्या निधीतून उत्तम दर्जाची कामे करण्यात येणार आहेत. गावातील प्रलंबित प्रश्न येत्या काही दिवसांत मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सरपंच सौ. नलवडे यांनी स्पष्ट केले.
जानेवारी २०२१ पासून शेरेचीवाडी गावासाठी आत्तापर्यंत जवळपास ४० लाखाहून अधिकचा निधी मिळविण्यात यश आले असून गावातील अंगणवाडीसाठी नवीन इमारत व अंतर्गत गटार योजनेचे काम सध्या चालू आहे. तसेच लवकरच जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम चालू होणार असल्याचीही माहिती तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष हणमंतराव चव्हाण यांनी दिली.
विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे व पंचायत समिती सदस्य विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास मार्गी लागत असून अंतर्गत रस्ता व प्राथमिक शाळेच्या दुरुस्तीसाठी साडे पाच लाख रुपयांचा विशेष निधी मिळवून दिल्याबद्दल ग्रामपंचायतीमार्फत सर्व मान्यवरांचे आभार मानन्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य राणी चव्हाण, अभिजीत मोहिते, शीतल फडतरे व महेश बिचुकले यांची सुध्दा उपस्थिती होती.