दैनिक स्थैर्य | दि. २२ फेब्रुवारी 2024 | फलटण | फलटण शहराची व तालुक्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता फलटण येथे स्वतंत्र आरटीओ कार्यालय म्हणजेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्यात यावे; यासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केलेली होती. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्वरित मंजुरी दिली होती. सातारा परिवहन कार्यालयाने फलटण येथे आरटीओ कार्यालय सुरू करण्यासाठीचा अहवाल त्वरित सादर करावा; असे आदेश परिवहन सचिवांनी पारित केलेले आहेत.
फलटण येथे स्वतंत्र आरटीओ कार्यालय सुरू करण्याबाबत आपण नेहमीच आग्रही राहिलेलो आहोत. फलटणची स्वतःची अशी ओळख व सर्वसामान्य फलटणकर नागरिकांना 60 ते 90 किलोमीटरचा बसणारा फटका बसू नये; यासाठी फलटण येथे आरटीओ कार्यालय सुरू होणे अत्यंत गरजेचे होते. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे. आगामी काळामध्ये फलटण येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय सुद्धा सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचे प्रस्ताव शासनाकडे दाखल असून त्यावर सुद्धा लवकरात लवकर आदेश पारित होतील; असा विश्वास यावेळी खासदार रणजितसिंह यांनी व्यक्त केला.