नाशिक येथील वैद्यकीय संस्थांच्या ३४८ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता – वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन


दैनिक स्थैर्य । दि. ०१ डिसेंबर २०२२ । मुंबई । नाशिक शहरातील लोकसंख्या विचारात घेऊन येथे वैद्यकीय महाविद्यालय आणि महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्यात आले आहे. या दोन्हींसाठी मंगळवारी शासन निर्णयान्वये 348 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.

नाशिक येथे वैद्यकीय महाविद्यालय आणि महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्यासाठी सन 2016-2019 या कालावधीत तत्वत: मान्यता देण्यात आली होती. यानंतर या दोन्ही संस्था सुरु करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत होता. 5 एप्रिल 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार नाशिक येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय आणि त्यास संलग्नित 430 रुग्णखाटांचे रुग्णालय तसेच महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्यात आली. यामुळे रुग्णांना मुंबई किंवा पुण्याऐवजी नाशिक येथेच विविध आजारांवरील विशेषोपचार व अतिविशेषोपचार सोय उपलब्ध होणार आहे. मंगळवारी शासन निर्णयानुसार या दोन्हींसाठी 348 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नाशिक येथे शासनाचे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन होण्याकरिता नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, आमदार राहुल आहेर यांनी पाठपुरावा केला.

नाशिक येथील नागरिकांना त्यांच्या शहरातच विशेषोपचार व अतिविशेषोपचार सुविधा शासनाच्या माध्यमातून माफक दरात उपलब्ध होतील. तसेच दरवर्षी नवीन 100 डॉक्टर जनतेसाठी उपलब्ध होणार असल्याचे श्री. महाजन यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!