माढा तालुक्यातील खैराव – मानेगाव उपसा सिंचन योजनेच्या पूर्वव्यवहार्यता अहवालास महाराष्ट्र शासनाची मंजुरी; योजनेमुळे १२ गावांचा पिण्याचा तसेच शेतीपाण्याचा प्रश्न मिटणार


दैनिक स्थैर्य | दि. ४ एप्रिल २०२३ | फलटण |
माढा तालुक्यातील खैराव – मानेगाव उपसा सिंचन योजनेच्या पूर्वव्यवहार्यता अहवालास महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिली आहे. या मंजुरीचे पत्र काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिले. या योजनेच्या मंजुरीमुळे माढा तालुक्यातील १२ गावांना पिण्याचे तसेच शेतीचे पाणी मिळून ही गावे दुष्काळाच्या छायेतून बाहेर पडणार असल्याचे खासदार रणजितसिंह यांनी सांगितले आहे.

जलसंपदा विभागाच्या कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत माढा तालुक्यातील खैराव मानेगाव उपसा सिंचन योजना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनेक दशके कायम दुर्लक्षित ठेवलेली योजना होती. सीना नदीवरील भीमा-सीना जोड कालव्यामधून ७३०.४८ द.ल.घ.फू. इतक्या पाण्याची बचत होत असल्याने सदर पाणी प्रस्तावित खैराव मानेगाव उपसा सिंचन योजनेसाठी वापरता येणे शक्य आहे, ही बाब खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जलसंपदा विभागाच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर शासनाने या क्षेत्राचे सर्वेक्षण करून खैराव मानेगाव उपसा सिंचन योजनेसाठी पूर्व व्यवहार्यता अहवाल झऋठ तयार करून त्याचा प्रस्ताव नियामक मंडळापुढे ठेवण्यात आला. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार करून याबाबत उपमुख्यमंत्री महोदयांनी बैठक घ्यावी, अशी विनंती केली होती. त्यानुसार ३१ जानेवारी २०२३ रोजी माढा मतदारसंघातील प्रलंबित जलसिंचन प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली व या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी खैराव मानेगाव उपसा सिंचन योजनेच्या पूर्व व्यवहार्यता अहवालास झऋठ तत्वत: मान्यता देण्यात आली, असे निर्देश दिले. त्यानंतर महामंडळाकडून खैराव मानेगाव उपसा सिंचन योजनेचा पूर्वव्यवहार्यता अहवाल तयार करून शासनाची मान्यता मिळणेसाठी सदर प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. त्यास काल शासनाने मंजुरी दिली व नियामक मंडळाकडे कार्योत्तर मान्यता घेण्यासाठी पाठवले आहे.

या योजनेच्या मंजुरीचे पत्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना काल देण्यात आले. यामुळे माढा तालुक्यातील ५० वर्षांपासून दुष्काळाच्या छायेत असलेल्या १२ गावांना शेतीपाण्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे व या भागाचा दुष्काळ कायमस्वरूपी संपणार आहे. त्यामुळे या भागातील गोरगरीब शेतकर्‍यांचा पिण्याच्या पाण्याचा व शेती पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला आहे.त्यामुळे या परिसरातील शेतकर्‍यांनी आनंदोत्सव साजरा केला आहे.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये पुढील निवडणूक ही माढा लोकसभा मतदारसंघातील पाणीप्रश्नावर होणार नाही, असा शब्द दिला होता. तो आज आपणाला पूर्ण होताना दिसत आहे. मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यामध्ये ज्या काही जलसंपदा विभागाच्या उपसा सिंचन योजना होत्या, त्या सर्व मार्गी लागलेल्या आपणास दिसत आहेत. त्यामुळे हा दुष्काळी लोकसभा मतदारसंघ म्हणून भविष्यामध्ये ओळखला जाणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लवकरच या भागातून पाणी फिरल्यानंतर या पट्ट्यातील अनेक छोटे-मोठे व्यावसायिक प्रकल्प तयार होतील व मतदार संघातील तरुणांच्या हाताला काम मिळेल, अशी आशाही खासदार निंबाळकर यांना वाटत आहे. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांचे आभार व्यक्त केले आहेत.


Back to top button
Don`t copy text!