दैनिक स्थैर्य | दि. २२ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
फेडरेशन ऑफ हुमड जैन समाज, महाराष्ट्र प्रोव्हींन्स यांच्या वतीने पर्युर्षण पर्वामध्ये ज्या श्रावक/श्राविकांनी १६, १०, ७ व ५ उपवास करून जैन समाजामध्ये धर्म प्रभावनेचे मोलाचे कार्य केले अशा व्यक्तींचा सत्कार प्रशस्तीपत्र, श्रीफळ व मोत्याची माळ देऊन करण्यात आला.
श्री १००८ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर, फलटण येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फेडरेशन ऑफ हुमड जैन समाजाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा (इंदापूर) हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून फेडरेशन ऑफ हुमड जैन समाज महाराष्ट्र प्रोव्हीन्सचे अध्यक्ष किरणकुमार शहा (पुणे), श्री चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरचे विश्वस्त अनिल शहा, राजेंद्र कोठारी, सा. आदेशचे संपादक विशाल शहा, अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्था सातारा जिल्हाध्यक्ष श्रीपाल जैन, महावीर भाऊ उपाध्ये उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. श्रेणिक शहा यांनी फेडरेशन ऑफ हुमड जैन समाज संघटनेच्या कार्याची माहिती दिली. फलटण ही जैन समाजाची ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखली जाते. गुजरात येथून ३००/४०० वर्षापूर्वी जैन समाज फलटणमध्ये दाखल झाल्याचे सांगून येथील त्यावेळचे संस्थानिक नाईक निंबाळकर घराण्याने जैन समाजाला राजाश्रय दिला. कालांतराने फलटण येथून जैन समाज इतरत्र विखुरला गेला असून आज सोलापूर, बारामती, इंदापूर, अकलूज, पंढरपूर, पुणे, सांगली, कोल्हापूर, बार्शी यासह इतर शहरात व ग्रामीण भागात हा समाज आपला व्यवसाय सांभाळून धार्मिक कार्यामध्ये अग्रेसर असल्याचे सांगितले. फलटण शहरामध्ये नेहमीच त्यागींचे वास्तव्य असते. विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजनही फलटण शहरामध्ये कित्येक वर्षापासून होत आहे. फलटण शहरातील जैन समाज धार्मिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असतो. पर्युषण पर्वामध्ये ज्यांनी ज्यांनी उपवास केले आहेत त्यांचा सत्कार करताना आनंद होत असल्याचे डॉ. श्रेेणिक शहा यांनी नमूद केले.
किरणकुमार शहा यांनी फेडरेशन ऑफ हुमड जैन समाज महाराष्ट्र प्रोव्हीन्सचे कामकाज उत्तमरित्या चालू असून समाजातील धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेणार्या श्रावक/श्राविकांचा यथोचित सन्मान करण्याचे काम संस्थेमार्फत केले जात असल्याचे सांगून येत्या जानेवारी महिन्यात पुणे येथे मधुर मिलन या संस्थेमार्फत जैन वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून त्यासंदर्भातील विस्तृत माहिती उपस्थितांना दिली. या मेळाव्यासाठी नावनोंदणी मोफत असून जास्तीत जास्त इच्छुक वधू-वरांनी आपले नाव नोंदविण्याचे आवाहन किरणकुमार शहा यांनी केले.
प्रथमतः सन्मती सेवा दलाचे माजी अध्यक्ष प्रीतम कोठारी यांनी उपस्थित मान्यवरांचे मोत्याची माळ व श्रीफळ देऊन स्वागत केले.
यावेळी राजेश रविंद्र मेहता (१६ उपवास), कु. सिद्धार्था जितेंद्र दोशी (७ उपवास), कु. रिषीका भूषण शहा, सौ. संगीता सुरेंद्र दोशी, सौ. सपना सुदीप गांधी, सौ. मयुरी स्वप्नील दोशी, सौ.संजाली बाहुबली दोशी (१० उपवास), हार्दिक सचिन दोशी, जित अनुप व्होरा, शौर्य विपुल दोशी, कु. स्तुती अक्षय गांधी, सौ.सोनाली सुरजकुमार दोशी, सौ. प्राची सुदर्शन फडे, स्मित अलोक दोशी, सौ. स्मिता बाहुबली शहा (५ उपवास) यांचा मान्यवरांचे हस्ते प्रशस्तीपत्र, श्रीफळ व मोत्याची माळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास सन्मती सेवा दलाचे संचालक मयूर शहा यांचे सहकार्य लाभले. यावेळी जैन समाजातील श्रावक/श्राविका उपस्थित होते. प्रास्ताविक प्रीतम कोठारी यांनी केले तर उपस्थितांचे आभार राजेंद्र कोठारी यांनी मानले.