दैनिक स्थैर्य | दि. १८ डिसेंबर २०२४ | फलटण |
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) मान्यताप्राप्त ‘सॉफ्टलाईन कॉम्प्युटर्स’, फलटण यांच्या वतीने छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) (महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था) या कार्यक्रमाअंतर्गत १६ डिसेंबर २०२४ रोजी दु. १.०० वाजता विद्यार्थी गुणगौरव सोहळा मुधोजी महाविद्यालयात आयोजित केला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, फलटण (सदस्य, मे गव्हर्निंग कौन्सिल, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण) हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रो. डॉ. पी. एच. कदम, प्राचार्य मुधोजी महाविद्यालय फलटण, उपप्राचार्य देशमुख सर, सुहास साठे सर एमकेसीएलचे मार्केटिंग एक्झिकुटीव्ह हे उपस्थित होते.
प्रारंभी दीपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन सौ. दीपाली निंबाळकर यांनी केले.
कार्यक्रमा उद्देशासंदर्भात सॉफ्टलाईन कॉम्प्युटर्सचे संचालक अतुल पेंढारकर सर यांनी प्रास्ताविक केले व सारथी कोर्सेसमधील असणार्या उपलब्ध संधी कोणत्या आहेत, हे सांगितले. सुहास साठे सर यांनीसुद्धा सारथी कोर्सविषयी सविस्तर माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी संगणकाचे ज्ञान आत्मसात करून आपला चरितार्थ चालवावा. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या नोकर्यांसाठी सारथीच्या कोर्सेसमधून नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, याविषयी माहिती देण्यात आली. तसेच एमकेसीएलचे एमएससीआयटी, केएलआयसी कोर्सेसची माहितीसुद्धा सविस्तर दिली.
विद्यार्थिनी राजगौरी कदम हिने आपले मनोगत इंग्रजी भाषेत व्यक्त करून सर्वांची मने जिंकली, कम्युनिकेशन स्किल्स व सॉफ्ट स्किल्सचा उपयोग व्यव्हारात कसा होईल, हे तिने सांगितले.
प्राचार्य प्रो. डॉ. पी. एच. कदम सर यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कौशल्य विकासाबाबत मार्गदर्शन केले. संगणक ही अशी गोष्ट आहे की, यासाठी प्रत्यक्ष प्रॅक्टिकल घ्यावे लागते, अनेक शहरी व ग्रामीण भागातील तरुण व तरुणींना आवाहन केले की, कम्युनिकेशन स्किल्स व सॉफ्ट स्किल्स याकडे विशेष लक्ष देणे महत्वाचे आहे, पुण्यातील विद्यार्थी कम्युनिकेशन स्किल्समध्ये पुढे जातो, याउलट ग्रामीण भागातील विद्यार्थी यात का मागे का राहतो, हे पटवून सांगितले.
समाजात सर्व थरातील लोकांसाठी शासनाने अनेक योजना दिल्या आहेत, कोणीही वंचित राहिला नाही. सारथी हा मोफत कोर्स आहे . मराठा समाजातील सर्वांनी हा करावा, असे सूचक विधान केले.
श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी इंग्लिश न्यूजपेपर, बुक्स हे सहा महिने काटेकोरपणे वाचावीत. यामधून कम्युनिकेशन स्किल्स व सॉफ्ट स्किल्सचे ज्ञान नक्कीच वाढेल, असे ठामपणे सांगितले.
सारथी कोर्सेसमधील विद्यार्थ्यांना श्रीमंत अनिकेतराजे यांनी पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. पुढे जाऊन यशस्वी व्हा, असा कानमंत्र दिला. उत्तम स्किल्स वाढून चांगले उद्योजक व्हा व फलटण शहराचा नावलौकिक वाढवा, नवीन तंत्रज्ञान वापरून रोजगार, स्वयंरोजगार, उद्योजकता यासाठी क्षमता निर्माण करा, असे आवाहन केले.
याप्रसंगी सारथी कोर्सेमधील विद्यार्थ्यांना मान्यवरांकडून सर्टिफिकेट देण्यात आली.
अतुल पेंढारकर सर यांनी आभार मानले.